लडाखमध्येही एलियनशी निगडित ठिकाण? | पुढारी

लडाखमध्येही एलियनशी निगडित ठिकाण?

नवी दिल्ली : जगाच्या पाठीवर काही ठिकाणे अशी आहेत ज्यांचे नाव नेहमीच एलियन म्हणजेच परग्रहवासीयांशी जोडले जाते. त्यामध्ये अमेरिकेतील ‘एरिया 51’, रशियातील ‘एम ट्रँगल’, बर्म्युडा ट्रँगल आदींचा समावेश होतो. भारतातही एक ठिकाण असे आहे ज्याला एलियन व ‘युफो’ (अनआयडेंटीफाईड फ्लाईंग ऑब्जेक्टस) म्हणजे ‘उडत्या तबकड्यां’शी जोडले जाते. हे ठिकाण आहे लडाखमध्ये. लडाखचा ‘कोंगका ला पास’ हा असा परिसर आहे जो पूर्णपणे निर्जन आहे. तिथे एलियन्स येतात, असा एक समज आहे.

असे म्हटले जाते की याठिकाणी एलियन्स येतात का हे समजून घेण्यासाठी संशोधकांनी 2004 मध्ये एक अभ्यास केला. त्यांच्या म्हणण्यानुसार अभ्यासादरम्यान लडाखच्या याच भागात एक रोबो फिरत असताना दिसला आणि संशोधक त्याठिकाणी पोहोचताच तो गायब झाला! 2012 मध्ये भारतीय लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांनीही अशीच एक रहस्यमय गोष्ट पाहिल्याचे नमूद केले होते. तिथे एक ‘युफो’ पाहिल्याचा अहवाल दिल्ली मुख्यालयाला पाठवण्यात आला होता, असेही म्हटले जाते.

या संपूर्ण प्रकरणावर संशोधकांची वेगवेगळी मते आहेत. काही संशोधकांचा असा विश्वास आहे की कोंगका लाचा थर जगातील सर्वात जुना आहे. त्याची खोली उर्वरित जगाच्या दुप्पट आहे. हा एक अतिशय मजबूत खडक आहे व त्यामुळे तिथे ‘युफो बेस’ असण्याची संकल्पनाही मजबूत होत असते. काही संशोधकांचे म्हणणे आहे की, याठिकाणी एलियन किंवा युफो असे काहीही नाही. याचे कारण इथे कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही.

Back to top button