उष्ण चहा-कॉफीने अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका | पुढारी

उष्ण चहा-कॉफीने अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका

लंडन : अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफीचा वाफाळलेला मग हातात धरूनच होते. गरमगरम चहा-कॉफीने उत्साह येत असला तरी अतिउष्ण चहा किंवा कॉफी पिणे हे धोकादायकही ठरू शकते. गरजेपेक्षा अधिक उष्ण चहा-कॉफीच्या सेवनाने घशातील अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका तिपटीने वाढतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

इंग्लंडच्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी बायो बँकेतून ब्रिटनच्या 5 लाखांपेक्षा अधिक लोकांचा डेटा तपासला. त्यामध्ये अधिक कॉफी पिणार्‍यांची आणि त्यांच्यामधील कर्करोगाच्या धोक्याबाबतची तुलना अन्य लोकांशी करण्यात आली. या संशोधनाचे निष्कर्ष क्लिनिकल न्यूट्रिशन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले.

चहा-कॉफीचे अत्याधिक सेवन करणार्‍या लोकांमध्ये एसोफेजल कॅन्सर म्हणजेच अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका 2.8 पट अधिक असतो, असे संशोधकांना आढळून आले. जे लोक गरम चहा किंवा कॉफीचे सेवन करतात त्यांच्यामध्ये हा धोका 2.7 पट अधिक असतो, तर अत्यंत उष्ण चहा-कॉफी पिणार्‍यांमध्ये हा धोका 5.5 पटीने वाढतो.

Back to top button