Dubai : जगातील सर्वात उंच इमारत 'बुर्ज खलिफा’भोवती बनणार विशाल कडी | पुढारी

Dubai : जगातील सर्वात उंच इमारत 'बुर्ज खलिफा’भोवती बनणार विशाल कडी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीमधील दुबईनगरी जगातील एक ‘नवलाईची नगरी’च बनलेली आहे. पाम वृक्षाच्या आकारातील कृत्रिम बेटं, वाळवंटात फुलवलेली जगातील सर्वात मोठी फुलबाग ‘मिरॅकल गार्डन’, जगातील सात आश्चर्यांच्या अफलातून प्रतिकृती, सर्वात खोल स्विमिंग पूल वगैरे अनेक गोष्टी तिथे पाहायला मिळतात. त्यामध्येच जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘बुर्ज खलिफा’चा समावेश होतो. आता या इमारतीभोवती एक भव्य कडी बनवली जाणार आहे.

‘नेरा स्पेस’ नावाच्या एका आर्किटेक्चरल कंपनीने ‘बुर्ज खलिफा’च्या भोवती ही रिंग बनवण्याच्या संकल्पनेचे डिझाईन बनवले आहे. याच कंपनीने इन्स्टाग्रामवर या डिझाईनचे फोटो शेअर केले आहेत. कंपनीचे दोन आर्टिस्ट नाजमस चौधरी आणि निल्स रेमेस यांनी हे डिझाईन बनवले आहे. ‘बुर्ज खलिफा’च्या चारही बाजूंनी 550 मीटर उंचीची ही रिंग बनवली जाईल. तिला ‘डाऊनटाऊन सर्कल’ या नावाने ओळखले जाईल. या रिंगचा परिघ तीन किलोमीटरचा असेल.

कंपनीने म्हटले आहे की हा एक सिंग्युलर मेगा बिल्डिंग कॉम्प्लेक्स असेल. त्याचा उद्देश एक हायपर एफिशियंट अर्बन सेंटर बनवणे आहे. त्याच्यापासून पर्यावरणाची हानी होणार नाही. या रिंगला छोट्या युनिटस्मध्ये विभाजित केले जाईल. या रिंगमध्ये घरे, पब्लिक स्पेस, कमर्शियल स्पेस आणि कल्चरल स्पेस असतील. महामारी व लॉकडाऊनच्या काळात या ‘डाऊनटाऊन सर्कल’ची संकल्पना निर्माण झाली. याठिकाणी एक ‘स्कायपार्क’ बनवण्याचीही योजना आहे. तिच्या आत नैसर्गिक द़ृश्ये व वातावरण निर्माण केले जाईल. तिथे अनेक प्रकारची झाडे, वाळूच्या टेकड्या, दर्‍या, धबधबे, डिजिटल गुहा बनवल्या जातील.

Back to top button