सौरमंडळात आढळला ‘मिनी मून’! | पुढारी

सौरमंडळात आढळला ‘मिनी मून’!

वॉशिंग्टन : आपल्या सौरमंडळात अनेक चंद्र आहेत. पृथ्वीला जरी एकच चंद्र असला तरी गुरू व शनीसारख्या ग्रहांना 80 पेक्षाही अधिक चंद्र आहेत. आता खगोलशास्त्रज्ञांनी सौरमंडळात एका ‘मिनी-मून’चा म्हणजेच छोट्या चंद्राचा शोध घेतला आहे. हा चंद्र कुठल्या ग्रहाभोवती नव्हे तर एका लघुग्रहाभोवती प्रदक्षिणा घालतो.

गुरू ग्रहाजवळच्या एका लघुग्रहाभोवती हा मिनी मून प्रदक्षिणा घालतो. हा ‘मिनी मून’ म्हणजे एक छोटी शिळा आहे. अमेरिकेच्या मॅनहॅटन शहरापेक्षा काहीशी अधिक रुंद असलेली ही शिळा आहे. जर या शिळेची एक चंद्र म्हणून पुष्टी झाली तर तिला आतापर्यंतचा सर्वात छोट्या आकाराचा चंद्र म्हणून नोंद होईल. या ‘मिनी मून’चा शोध ‘नासा’च्या ल्यूसी मिशनवर काम करणार्‍या संशोधकांनी घेतला आहे.

या मोहिमेत काही ट्रोजन अ‍ॅस्टेरॉईडस् (छुपे लघुग्रह), गुरू ग्रहाभोवती असलेले खगोलीय शिळांचे दोन विशालकाय समूह यांचे ल्यूसी प्रोबकडून निरीक्षण करण्यात येईल. हे यान 16 ऑक्टोबर 2021 मध्ये लाँच करण्यात आले होते आणि ते 2027 च्या अखेरपर्यंत ट्रोजन अ‍ॅस्टेरॉईडस्पर्यंत पोहोचेल. मंगळ आणि गुरू ग्रहादरम्यान लघुग्रहांचा एक पट्टा असून त्याला ‘अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट’ असे म्हटले जाते. प्रवासात काही काळ या पट्ट्याजवळही ते थांबेल.

Back to top button