‘हमशकल’ अनोळखी लोकांच्या सवयीही सारख्याच! | पुढारी

‘हमशकल’ अनोळखी लोकांच्या सवयीही सारख्याच!

माद्रिद : हे छायाचित्र पाहिल्यावर अनेकांना वाटू शकेल या जुळ्या बहिणीच आहेत. खरे तर त्या जुळ्या नाहीत व बहिणीही नाहीत. दोघींमध्ये कोणतेही नाते नाही आणि तरीही त्या एकमेकींसारख्या दिसतात. जगाच्या पाठीवर हुबेहूब आपल्यासारख्या दिसणार्‍या सात व्यक्ती तरी असतातच असे म्हटले जाते. त्याची प्रचिती अनेक वेळा येत असते.

सर्वसामान्य लोकांचे ‘हमशकल’ समोर येत नसले तरी अनेक सेलिब्रिटींचे ‘हमशकल’ म्हणजेच त्यांच्यासारखा चेहरा असणारे लोक आपण पाहत असतो. संशोधकांनी म्हटले आहे की एकमेकांसारख्या दिसणार्‍या अनोळखी लोकांच्या सवयींमध्येही कमालीचे साम्य आढळून आले आहे, मग या व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असोत!

स्पेनच्या जोसेफ करेरास ल्युकेमिया रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी याबाबतचा दावा केला आहे. हे संशोधन ‘सेल’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. डॉ. मनाल अ‍ॅस्टेलर यांनी याबाबत सांगितले की हुबेहूब दिसणार्‍या व्यक्ती जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात राहत असल्या तरीही अनेक बाबतीत सारख्याच असतात. त्यांच्या सवयी, जीवन जगण्याची पद्धतही तंतोतंत सारखीच असते.

उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला खाण्याची आवड असेल तर संबंधित व्यक्तीसारखी दिसणारी व जगाच्या दुसर्‍या कोपर्‍यात राहणारी व्यक्तीही खवय्याच असते. या संशोधनासाठी 32 जोड्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी एका अद्ययावत फेस रिकग्निशन सॉफ्टवेअरचा वापर केला गेला. या सॉफ्टवेअरच्या मदतीने हुबेहूब एकमेकांसारख्या दिसणार्‍या व जीन्स इतरांशी जुळणार्‍या सोळा जोड्यांना वेगळे करण्यात आले. त्यानुसार अशा लोकांच्या 3,730 जीन्समध्ये 19,277 समान व्हेरिएशन्स दिसून आले होते.

Back to top button