दक्षिण कोरियात सर्वात कमी प्रजनन दर | पुढारी

दक्षिण कोरियात सर्वात कमी प्रजनन दर

सेऊल : दक्षिण कोरियाने जगातील सर्वात कमी प्रजनन दराचा (फर्टिलिटी रेट) आपलाच विक्रम आता पुन्हा एकदा मोडला आहे. बुधवारी जारी झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये या देशाचा प्रजनन दर आणखी खालावून तो 0.81 टक्के झाला. यावर्षी तो यापेक्षाही अधिक खाली जाईल असा अंदाज आहे.

या देशात 1970 पासूनच प्रजनन दरात घसरण होत आहे. त्यावेळी प्रजनन दर 4.53 टक्के होता. सन 2000 पासून त्यामध्ये वेगाने घट होऊ लागली. 2018 मध्ये प्रजनन दर एक टक्क्यापेक्षाही कमी होता. सलग सहा वर्षांपासून झालेल्या घसरणीनंतर 2021 मध्ये तो केवळ 0.81 टक्क्यांवर आला.

चालू वर्षात तो यापेक्षाही खाली जाऊ शकतो. भारताचा विचार केला तर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षण (एनएफएचएस-5) च्या पाचव्या टप्प्यातील रिपोर्टनुसार देशातील एकूण प्रजनन दर 2.2 वरून घसरून तो 2.0 टक्के झालेला आहे. देशातील लोकसंख्या नियंत्रण मोहिमेस यश येत असल्याचे हे लक्षण आहे. केवळ पाच राज्यांमध्ये प्रजनन दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामध्ये बिहार (2.98), मेघालय (2.91), उत्तर प्रदेश (2.35), झारखंड (2.26) आणि मणिपूर(2.17) यांचा समावेश आहे. एकूण प्रजनन दर (टीएफआर) हा प्रतिमहिला मुलांच्या सरासरी संख्येत मोजला जातो.

Back to top button