स्टिव्ह जॉब्सचा प्रोटोटाईप कॉम्प्युटर | पुढारी

स्टिव्ह जॉब्सचा प्रोटोटाईप कॉम्प्युटर

लंडन ः ‘अ‍ॅपल’चे दिवंगत संस्थापक स्टिव्ह जॉब्स यांनी 1976 मध्ये एक प्रोटोटाईप कॉम्प्युटर तयार केला होता. हा ‘अ‍ॅपल-1’ प्रोटोटाईप आता 6,77,196 डॉलर्स म्हणजेच सुमारे 5.5 कोटी रुपयांमध्ये विकला गेला आहे. काही दिवसांपूर्वीच हे प्रोटोटाईप मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. एका संग्राहकाने तो लिलावात खरेदी केला.

स्टिव्ह जॉब्स यांनी 1976 मध्ये कॅलिफोर्नियातील माऊंटन व्ह्यू येथील ‘बाईट शॉप’चे मालक पॉल टेरेल यांना कॉम्प्युटरचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हा प्रोटोटाईप तयार केला होता. हे जगातील पहिल्या वैयक्‍तिक कॉम्प्युटर दुकानांपैकी एक होते. आर.आर. ऑक्शन हाऊसमध्येच या कॉम्प्युटर प्रोटोटाईपचा लिलाव करण्यात आला.

हे अ‍ॅपल डिव्हाईस स्टिव्ह वोझ्नियाक, पॅटी जॉब्स आणि डॅनियल कोटके यांच्यासह स्टिव्ह जॉब्स यांनी विकसित केलेल्या 200 युनिटस्पैकी एक आहे. ‘अ‍ॅपल-1’ चे उत्पादन थांबण्यापूर्वी केवळ 200 युनिटस् विकले गेले होते. ते ज्यावेळी लाँच झाले होते त्यावेळी त्याची किंमत 666.66 डॉलर्स म्हणजेच सुमारे 49 हजार रुपये होती. ‘प्रोटोटाईप’ म्हणजे चाचणी घेण्यासाठी तयार केलेला उत्पादनाचा नमुना किंवा मॉडेल.

Back to top button