नदी आटल्याने आढळले डायनासोरच्या पायाचे ठसे | पुढारी

नदी आटल्याने आढळले डायनासोरच्या पायाचे ठसे

वॉशिंग्टन ः संपूर्ण जगभर यंदाचा उन्हाळा ‘न भुतो’ असाच ठरलेला आहे. युरोप-अमेरिकेतही कधी नव्हे इतके कडक तापमान आहे व दुष्काळाच्या झळा पाश्‍चिमात्य देशांनाही लागलेल्या आहेत. अमेरिकेतही अनेक सरोवर व नद्यांचा जलस्तर घटलेला आहे. आता एका अशाच आटलेल्या नदीच्या पात्रात तब्बल 11 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.

टेक्सासमधील डायनासोर व्हॅली स्टेट पार्कमधून ही नदी वाहते. या नदीचे पाणीही भीषण उन्हाळ्याने कमी झाल्याने हे ठसे दिसून आले. डायनासोर पार्कच्या प्रवक्त्या स्टेफनी सेलिनास गार्सिया यांनी सांगितले की पार्कमध्ये आढळलेले बहुतांश पायाचे ठसे हे या उन्हाळ्यातच उघड झालेले आहेत. हे ठसे ‘अ‍ॅक्रोकँथोसॉरस’ नावाच्या डायनासोरचे आहेत. ज्या डायनासोरचे हे ठसे आहेत तो एक प्रौढ जीव असावा असे दिसते. त्याची लांबी 15 फूट आणि वजन सुमारे 7 टन असावे. ग्लेन रोजमध्ये अन्य एका प्रजातीच्या डायनासोरच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत.

त्यामध्ये सोरोपोसीडॉनच्या पायांचे ठसे आहेत. हा डायनासोर सुमारे 60 फूट लांब व 44 टन वजनाचा होता. यंदा टेक्सासमध्ये भीषण उन्हाळ्याने दुष्काळ पडलेला आहे. पार्कमधील एक नदी जवळ जवळ पूर्णपणे आटून गेली आहे. मात्र, यामुळे डायनासोरच्या ट्रॅकचा छडा लावणेही संशोधकांना शक्य झाले आहे.

Back to top button