

लंडन : ऑगस्टच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कॉनकोर्डिया रिसर्च स्टेशनवरील बारा सदस्यांच्या क्रूला अत्यानंद झाला. याठिकाणी तब्बल चार महिन्यानंतर पहाट फुलली व उषःकाल झाला. अखेर अंटार्क्टिकामध्ये चार महिन्यांनंतर हिवाळा संपला आणि हवामानात बदल घडला. सूर्योदय होणे हे वैज्ञानिकांसाठीही अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण आहे.
याचवर्षी मे मध्ये दक्षिण गोलार्धातील या ध्रुवावर सूर्यास्त झाला होता आणि चार महिन्यांची दीर्घ रात्र सुरू झाली होती. पुन्हा एकदा सूर्योदय होण्याची रिसर्च स्टेशनवरील संशोधक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या महिन्यात दक्षिण ध्रुवावर रात्रीच्या गर्भातून उषा प्रकटली. युरोपियन स्पेस एजन्सीने एका ब्लॉगमधून याबाबतची माहिती दिली व तेथील फोटोही शेअर केला. तेथे राहणार्या वैज्ञानिकांनी आपले संशोधन तीन चतुर्थांशाने पूर्ण केले होते व आता ते पूर्णपणे पार पडेल.
युरोपियन स्पेस एजन्सीच्या डॉ. हॅन्स हॅगसन यांनी रिसर्च स्टेशनच्या मेन डोअरमधून या पहाटेचा सुंदर फोटो टिपला व तो शेअर केला. सूर्यकिरणांनी आमच्या चेहर्यावर स्मित आणले आहे आणि आता या साहसी कार्याचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. अंटार्क्टिकामध्ये हिवाळा अतिशय कडक असतो व तेथील तापमान उणे 80 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी होते. हिवाळ्यात चार महिने तिथे निबीड अंधःकारच असतो.