रोबो बोटीने बनवला सागरी ज्वालामुखीचा नकाशा | पुढारी

रोबो बोटीने बनवला सागरी ज्वालामुखीचा नकाशा

लंडन : इंग्लंडमधून नियंत्रित होणार्‍या एका रोबो बोटीने पाण्याखाली असलेल्या टोंगन ज्वालामुखीचा नकाशा बनवला आहे. या ज्वालामुखीचा जानेवारीत उद्रेक झाला होता. ही रोबो बोट म्हणजे एक ‘अनक्रुड सरफेस व्हेईकल’ (यूएसव्ही) आहे. ही मानवरहीत रोबो बोट ‘मॅक्सलिमर’ पाण्याखाली असलेल्या हुंगा-टोंगा हुंगा-हॅपेई ज्वालामुखीचाही नकाशा बनवणार आहे.

‘सी-किट इंटरनॅशनल’ या ब्रिटिश कंपनीने ही रोबो बोट तयार केली आहे. टोंगा इरप्शन सीबेड मॅपिंग प्रोजेक्टच्या दुसर्‍या टप्प्यानुसार ही बोट ज्वालामुखीची पाहणी करून नकाशा बनवत आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व न्यूझीलंडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड अ‍ॅटमॉस्फिरिक रिसर्चकडून केले जात आहे. त्याला जपानच्या निप्पोन फौंडेशनने निधी दिला आहे. ही ‘मॅक्सलिमर’ बोट बारा मीटर लांबीची आहे. ही रोबो बोट तब्बल 16 हजार किलोमीटर अंतरावरून संचलित केली जात आहे.

एसेक्समधील टोलेसबरी या किनारपट्टीवरील छोट्याशा गावातून ती सध्या संचलित होत आहे. या बोटीवर दहा अद्ययावत कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यांच्या सहाय्याने टिपलेल्या प्रतिमांचा वापर करून या पाण्याखालील सागरी ज्वालामुखींचे नकाशे बनवले जात आहेत.

Back to top button