कार आहे की अंतराळयान? | पुढारी

कार आहे की अंतराळयान?

वॉशिंग्टन : अनेक ऑटोमोबाईल कंपन्या कन्सेप्ट कार बनवत असतात. अशा मोटारींचे व्यावसायिक उत्पादन होईलच असे नसते, पण आपल्या अनेक वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे त्या जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतात. अशा अनेक संकल्पनेतील मोटारींचा लूकही ‘हट के’च असतो. आता अशाच एका कन्सेप्ट कारने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ही कार जणू काही अंतराळयानच वाटावी, अशी आहे.

एका अमेरिकन कार कंपनीने ही कन्सेप्ट कार सादर केली आहे. ही लक्झरी कार फ्युचरिस्टिक कार ‘एरो-कट’ डिझाईन स्टायलिंग आणि प्रगत इंटिरिअर तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे. ही कन्सेप्ट कार पेबल बीच कॉन्कोर्स डी एलिगन्स येथे सादर केली जाणार आहे. या कारची बाह्य रचना एखाद्या अंतराळयानासारखी आहे. ही एक लो फ्लोअर कार असल्याने ती जमिनीला खेटून असल्यासारखी दिसते. या कारमध्ये काचेचे छत आणि मागील बाजूस उघडणारे दरवाजे आहेत. आतील भागात अनेक प्रकाश सेन्सर्स आणि मोशन सेन्सर्स आहेत.

हे सेन्सर्स केबिनमधील हालचालींमधून एखाद्या व्यक्तीची उपस्थिती ओळखून आपोआप कार चालू करतील. अ‍ॅम्बियंट लाईट, डिजिटल फ्लोअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम आणि जीपीएस सेन्सर तुम्ही गाडीत बसताच कार्यान्वित होतील. या कारमध्ये नेक्स्ट-जनरेशन बॅटरी सेल वापरण्यात येणार आहेत. ही भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आणि कनेक्टिव्हीटी असलेली स्वयंचलित कार आहे.

Back to top button