सौदी अरेबियाच्या गायकाचे ‘सारे जहाँ से अच्छा’ | पुढारी

सौदी अरेबियाच्या गायकाचे ‘सारे जहाँ से अच्छा’

रियाध : भारताविषयी प्रेम असणारे अनेक लोक जगाच्या पाठीवर आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अशा लोकांनी भारताला व भारतीयांना भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यामध्येच सौदी अरेबियातील प्रसिद्ध गायक हाशिम अब्बास यांचा समावेश आहे. त्यांनी गायिलेल्या ‘सारे जहाँ से अच्छा’चा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

भारताविषयी प्रेम असणारे सौदी अरेबियामध्ये अनेक लोक आहेत. त्यामध्ये प्रख्यात योगशिक्षिका असलेल्या नौफ मरवाई यांचाही समावेश आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच सौदी अरेबियात योगासनांना अधिकृत मान्यता मिळाली. त्यांनी ‘अरब योगा फौंडेशन’ची स्थापना केलेली असून भारत सरकारने त्यांना योगविद्येच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘पद्मश्री’ बहाल केलेली आहे. हाशिम अब्बास हे सुद्धा भारताबद्दल आत्मियता बाळगणारे कलाकार आहेत.

त्यांनी यापूर्वी 26 जानेवारी 2021 मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारताचे राष्ट्रगीत गायिले होते. त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर ओणम या भारतीय सणानिमित्तही एक गाणे आले होते. आता त्यांनी हातात तिरंगा घेऊन गायिलेल्या ‘सारे जहाँ से अच्छा’ला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला व तो शेअर केला. यापूर्वी पाकिस्तानी संगीतकाराने रबाब या पारंपरिक वाद्यावर वाजवलेली भारतीय राष्ट्रगीताची धूनही लोकप्रिय झाली होती.

Back to top button