प्राचीन काळी अस्तित्वात होते मोठे शार्क | पुढारी

प्राचीन काळी अस्तित्वात होते मोठे शार्क

लंडन : सध्या समुद्रामध्ये आढळणारे शार्क आकाराने भलेही मोठे नसले तरी कोट्यवधी वर्षांपूर्वी ते इतके मोठे होते की, एखाद्या मोठ्या व्हेल माशालाही ते अवघ्या चार ते पाच घासात चट्ट करू शकत होते. संशोधकांच्या मते, हे शार्क आकाराने एखाद्या मोठ्या शाळेइतके होते. सध्या अस्तित्वात असलेल्या व्हाईट शार्कपेक्षाही ते दोन ते तीन पटीने मोठे होते. शास्त्रज्ञांनी अशा शार्क माशांना ‘मेगाडेलॉन’ असे नाव दिले आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, मेगाडेलॉन शार्कचे सध्या पृथ्वीतलावर अस्तित्व नाही. पण सुमारे 26 लाख वर्षांपूर्वी ते समुद्रात राहात होते. हे मासे 2.3 कोटी वर्षांपासून अस्तित्वात होते. तसेच त्यांचे वजन दहा हत्तींपेक्षाही जास्त म्हणजे तब्बल 70 टन इतके प्रचंड असावयाचे. तरीही सॉफ्ट कार्टिलेज असल्याच्या कारणास्तव या जलचरांचे जीवाश्म जास्त सुरक्षित राहू शकत नव्हते. बेल्जियममधील एका म्यूझियममध्ये या माशाचे दुर्लभ जीवाश्म उपलब्ध आहे. हे जीवाश्म 1860 मध्ये सापडले होते. अशा जीवाश्मांच्या मदतीने शास्त्रज्ञांनी शार्कचे थ्रीडी मॉडेल तयार केले आहे.

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार आतापर्यंतच्या ज्ञात माशांमध्ये मेगाडेलॉन हा सर्वात मोठा मासा ठरतो. या शार्कचा जबडा अत्यंत मोठा असावयाचा. यामुळे ते अन्य मोठ्या सागरी जीवांना अत्यंत सहजपणे भक्ष्य करू शकत होते. मात्र, एकदा का पोट भरले की ते अनेक महिने काही न खाता राहात असत. तसेच एकदा पोट भरले की ते समुद्रात मनसोक्‍त विहार करत असत. तसेच त्यांचा वेगही प्रचंड असे.

Back to top button