

वॉशिंग्टन : मंगळावर मानवी मोहीम पाठवावयाची असेल तर एक मोठे आणि अवघड आव्हान पार करावे लागणार आहे. ते आहे मंगळावर ऑक्सिजन निर्मितीचे. शास्त्रज्ञ सध्या अनेक प्रयोगावर काम करत आहेत. यापैकी एक प्रयोग मंगळाच्या बाबतीतही सुरू आहे.
शास्त्रज्ञांच्या एका पथकाने मंगळावर कार्बन डायऑक्साईडपासून ऑक्सिजन तयार करण्याचा एक नवा उपाय शोधून काढला आहे. हा उपाय प्लाझ्मा आधारित पद्धतीवर आहे. हा उपाय केवळ मंगळावर मानवी मोहीम पाठवण्यासाठीच उपयोगात येणार आहे, असे नाही तर भविष्यात दीर्घ अंतराच्या मानवी अंतराळ मोहिमांसाठीही ते उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
कार्बन डायऑक्साईडपासून ऑक्सिजनची निर्मिती करण्याचे हे तंत्रज्ञान नासाच्या मंगळ ग्रहाबाबत सुरू असलेल्या 'ऑक्सिजन इन सीटू रिसोर्स युटीलायझेशन एक्स्पेरिमेंट' प्रयोगासाठी एक सहायक पद्धत म्हणून उपयोगी पडणार आहे. हे तंत्रज्ञान अंतराळात पाठवण्यात येणार्या उपकरणांच्या तुलनेत प्रति किलो जास्त अणुंचे उत्पादन करण्यास उपयुक्त ठरणार आहे. या माध्यमातून ऑक्सिजनची निर्मिती होण्याची शक्यता बळावते.
अशा प्रकारचे तंत्रज्ञान हे मंगळ ग्रहावर 'लाईफ सपोर्ट सिस्टम'च्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची शक्यता आहे. याशिवाय या तंत्रज्ञानाच्या मदतीने इंधन, इमारतींसाठी लागणारे पदार्थ आणि अन्नासाठी मूळ रसायनाचेही उत्पादन करण्यास उपयोगी पडणार आहे.