चार अब्जांचा, पण ‘शापित’ भव्य महाल | पुढारी

चार अब्जांचा, पण ‘शापित’ भव्य महाल

लंडन : युनायटेड किंगडममधील ‘हॅमिल्टन पॅलेस’ला ‘घोस्ट हाऊस ऑफ ससेक्स’ या नावानेही ओळखले जाते. हा पॅलेस इंग्लंडच्या महाराणींच्या महालापेक्षाही मोठा आहे. हॅमिल्टन पॅलेसच्या बांधकामास मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली, पण तब्बल 37 वर्षांनंतर आजही ते काम पूर्ण झाले नाही. या अपूर्ण पॅलेसमुळे आसपास राहणारे लोक मात्र भीतीच्या छायेत राहतात. अनेक लोक तर या पॅलेसला ‘भुतांचे घर’च समजतात.

ब्रिटनमध्ये बांधण्यात आलेल्या दुसर्‍या कोणत्याही इमारतींपेक्षा हॅमिल्टन पॅलेस महागडे आहे. मात्र, अज्ञात कारणामुळे या पॅलेसचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. तसे पाहिल्यास हॅमिल्टन पॅलेसच्या बांधकामास 1985 मध्ये सुरुवात करण्यात आले होते. हा पॅलेस युकेमधील बकिंघम पॅलेसपेक्षाही मोठा आहे. पॅलेसच्या बांधकामासाठी सुमारे चार अब्ज रुपये खर्चण्यात आले. इतका पैसा खर्च होऊनही येथे कोणीच राहू शकले नाहीत.

सध्या हॅमिल्टन पॅलेस पूर्णपणे जंगलाने वेढलेला आहे. कोणालाही पॅलेसमध्ये जाण्यास परवानगी नाही. तसेच गेटवर स्पष्ट शब्दात लिहिण्यात आले आहे की, कोणीही आत जाऊ नये. यामुळे अपूर्णावस्थेत असलेला हा पॅलेस पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, त्यांना बाहेरूनच तो पहावा लागतो. या पॅलेसची ड्रोनने घेतलेली छायाचित्रे नुकतीच शेअर करण्यात आली आहेत. यामध्ये पॅलेसमध्ये पुन्हा बांधकाम करण्यात येत असल्याचे दिसून येते.

Back to top button