रशियन लोकांना मिळतो जुळा ‘रोबो’ भाऊ! | पुढारी

रशियन लोकांना मिळतो जुळा ‘रोबो’ भाऊ!

मॉस्को : रशियातील ‘प्रोमोबॉट्स’ नावाच्या कंपनीत एखाद्या व्यक्तीचा ‘जुळा’ रोबो बनवला जातो. या कंपनीची खासियत म्हणजे एखाद्या माणसामध्ये असणारे गुण किंवा त्याचे रूप जसेच्या तसे रोबोमध्ये आणले जातात. मागील काही वर्षांमध्ये रशियात अशा प्रकारचे रोबो बनवण्याचा ट्रेंड वाढला आहे. या कंपनीने असे अनेक रोबो बनवले आहेत. याचा अर्थ आता एखाद्या व्यक्तीचा जुळा भाऊ किंवा जुळी बहीण ही अशा प्रकारे फॅक्टरीतही बनवली जात आहे!

एखाद्या माणसासारखा हुबेहूब रोबो बनवणे हेच या फॅक्टरीचे वैशिष्ट्य नाही तर संबंधित माणसासारख्या ‘स्वभावा’चाही हा रोबो असेल. या कंपनीने अनेक लोकांचे असे ‘टि्वन रोबो’ बनवून दिलेले आहेत. कंपनीने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियातही शेअर केला आहे. यामध्ये एका ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतर त्याचा टि्वन रोबो कसा बनवला जातो हे दाखवले गेले आहे. हे रोबो संबंधित माणसासारखे दिसतात आणि त्याच्यासारखेच काम करतात.

या रोबोचा ‘स्वभाव’ही संबंधित माणसासारखाच असतो, पण त्याचा कुणी गैरवापर करू नये याची कंपनी काळजी घेते. कुणाच्याही सांगण्यावरून एखाद्याचा असा जुळा रोबो बनवला जात नाही. संबंधित व्यक्तीने स्वतः कंपनीत येऊन जर रितसर ऑर्डर दिली तरच त्या माणसासारखा रोबो बनवला जातो. एखाद्या माणसाचा चेहरा वापरून रोबोचा गैरवापर होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते.

Back to top button