‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेने मानसिक आरोग्यावरही परिणाम | पुढारी

‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेने मानसिक आरोग्यावरही परिणाम

नवी दिल्ली : विविध जीवनसत्त्वांचे योग्य प्रमाणात शरीरात असणे आरोग्यासाठी आवश्यक असते. ‘ड’ जीवनसत्त्व हे त्यापैकीच एक आहे. कोवळ्या उन्हामुळे ते नैसर्गिकरित्याच शरीरात निर्माण होत असते. याशिवाय विशिष्ट आहारातूनही ते शरीराला मिळते. त्याची कमतरता असेल तर शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम होत असतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरातील हाडे व दातही कमजोर होऊ लागतात. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमबरोबरच ‘ड’ जीवनसत्त्वही आवश्यक असते. जर या पोषक तत्त्वाची कमतरता असेल तर कॅल्शियम योग्यरित्या शोषले जाऊ शकत नाही. त्यामुळे हाडे, दात व शरीरात तीव्र वेदना होतात व थकवा जाणवू लागतो. सामान्यतः दुखापत झाली तर ती देखील काही दिवसांत बरी होते. मात्र जर वेदना कमी होण्यास सामान्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तुमच्या शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आहे, असा अर्थ होऊ शकतो. हे एक असे पोषक तत्त्व आहे जे जळजळ व सूज कमी करण्यासही मदत करते. ‘ड’ जीवनसत्त्व मानसिक आरोग्यासाठीही गरजेचे आहे.

मन पूर्णपणे निरोगी असेल तर शरीरही निरोगी राहते व आपले दैनंदिन व्यवहारही सुरळीत होत राहतात. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर तर डिप्रेशन म्हणजेच औदासिन्य किंवा नैराश्याच्या गर्तेत सापडण्याचा धोका अधिक असतो. ध्रुवीय प्रदेशांमध्ये अनेक महिने सूर्यप्रकाश नसतो. अशा वेळी तेथील लोकांनाही तणाव जाणवतो व मनःस्थिती बिघडते. हे जीवनसत्त्व अंडी, मासे, मशरुम, दूध व दुग्धजन्य पदार्थ, संत्री, पपई, टोमॅटो, हिरवे वाटाणे यासारख्या आहारातून मिळते.

Back to top button