सूर्यापेक्षा शंभर पट मोठ्या तार्‍याचा झाला होता स्फोट | पुढारी

सूर्यापेक्षा शंभर पट मोठ्या तार्‍याचा झाला होता स्फोट

कॅनबेरा : नाम-रूपाच्या या दुनियेत कोणतीही गोष्ट शाश्वत नाही असे आपल्याकडे म्हटले जाते. ग्रह-तार्‍यांचे आयुष्य तुलनेने अत्यंत दीर्घ असले तरी त्यांचाही एक दिवस अंत होतोच. सूर्यासारख्या तार्‍यांचा अंत होत असताना त्यांच्यामध्ये मोठा स्फोट होतो. या अतिशय दीप्तीमान घटनेला ‘सुपरनोव्हा’ असे म्हटले जाते.

केपलर या दुर्बिणीने अशाच एका ‘सुपरनोव्हा’ झालेल्या तार्‍याला टिपले आहे. सूर्यापेक्षा शंभरपट मोठ्या या तार्‍याचा अब्जावधी वर्षांपूर्वी स्फोट झाला होता व त्याचा प्रकाश आता आपल्यापर्यंत पोहोचला आहे.

सूर्यापेक्षा मोठ्या या तार्‍याच्या स्फोटामुळे अंतराळात मोठीच घडामोड झाली. शॉक वेव्ह आणि तार्‍याचे अवशेष दूरपर्यंत फैलावले. आता त्याचा प्रकाश केपलर दुर्बिणीने आपल्या कॅमेर्‍यात टिपून घेतला आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या पॅट्रिक आर्मस्ट्राँग या पीएच.डी. विद्यार्थ्याने या सुपरनोव्हाचा छडा लावला आहे.

त्याबाबतची माहिती ‘मंथली नोटिसेज ऑफ द रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. ‘केपलर’ दुर्बिणीने 2018 मध्येच आपले काम थांबवले आहे. तत्पूर्वी, एका विशिष्ट वेळी या दुर्बिणीला हा प्रकाश टिपण्यात यश आले होते. आता त्याच्या डेटाच्या सहाय्याने या सुपरनोव्हाचा छडा लावण्यात आला.

पॅट्रिकचे ‘गाईड’ बॅड टकरही अनेक वर्षांपासून या टेलिस्कोपच्या डेटाचा अभ्यास करीत आले आहेत. टकर यांनी सांगितले की एखाद्या आकाशगंगेत दर शंभर वर्षांनी एखाद्या तार्‍याचा स्फोट होत असतो.

Back to top button