सुंदर, विविध रंगाच्या सागरी जीवाचा शोध | पुढारी

सुंदर, विविध रंगाच्या सागरी जीवाचा शोध

नवी दिल्ली : संशोधकांना नुकताच एक अत्यंत सुंदर व विविधरंगी जलजीव आढळला आहे. मात्र, हा जीव पाहण्यासाठी समुद्राच्या तळाशी जावे लागते. या जीवाची हालचाल अत्यंत लयबद्ध असते. यामुळेच त्याला ‘स्पॅनिश डान्सर सी स्लग’ असे म्हटले जाते. मात्र, त्याचे वैज्ञानिक नाव अत्यंत अवघड आहे. हा शब्द उच्चारताना तोंड वेडेवाकडे झाल्याशिवाय राहणार नाही.

स्पॅनिश डान्सर ‘सी स्लग’चे वैज्ञानिक नाव ‘हेक्साब्रँचस सँजिनिअस’ असे आहे. दिसायला अत्यंत सुंदर असलेला सागरी जीव 60 सेंटीमीटरपर्यंत वाढू शकतो. सर्वसामान्यपणे त्याचा आकार 20 ते 30 सेंमी इतका असतो. मात्र, बालीतील समुद्रात सुमारे 90 सेंमी इतका स्पॅनिश डान्सर सी स्लग आढळला होता.

स्पॅनिश डान्सर सी स्लगचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्याचा रंग. हा जीव लाल, पिवळा, नारंगी अशा अनेक रंगात असतो. त्याच्या शरीराचे काही अवयव पारदर्शी असतात. याशिवाय शरीरावर तांबडे डाग असतात आणि ते अत्यंत नाजूक असतात. याशिवाय संपूर्ण शरीर चपटे असते. शरीराच्या खालील भागाला सहा गिल्स असतात. लहान सागरी जीव हेच स्पॅनिश डान्सर सी स्लगचे प्रमुख खाद्य असते. हा जीव अत्यंत शांत असतो.

पण धोका निर्माण होताच त्याचे गिल्स आकुंचन पावतात आणि कमी होताच पुन्हा प्रसरण पावतात. याच प्रकारची त्याची हालचाल अत्यंत लयबद्ध वाटते. हा जलचर प्रामुख्याने हिंद महासागर, अरबी समुद्र, पॅसिफिक महासागर, आफ्रिकन समुद्र, तांबडा समुद्र, हवाई, द. जपान ते ऑस्ट्रेलिया आढळून येतो.

Back to top button