मंगळावर दिसला ‘कान’! | पुढारी

मंगळावर दिसला ‘कान’!

वॉशिंग्टनः मंगळभूमीच्या अनेक छायाचित्रांमधून आतापर्यंत लोकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण आकृत्या शोधलेल्या आहेत. मानवाकृतीपासून ते अगदी पशुपक्षी व कीटकांसारख्या दिसणार्‍याही आकृत्या दिसून आलेल्या आहेत. आता मंगळावर चक्‍क मानवी कानासारखी आकृती दिसून आली आहे. अर्थात, ही आकृती म्हणजे मंगळावरील एक क्रेटर (विवर) आहे. हे विवर हुबेहूब कानासारखे दिसत असल्याने लोकांचे लक्ष त्याकडे वेधले जाणे साहजिकच आहे.

‘नासा’च्या हाय-टेक मार्स रिकनायसन्स ऑर्बिटरच्या माध्यमातून हे छायाचित्र टिपले आहे. हे ऑर्बिटर 2006 पासून मंगळाची परिक्रमा करीत आहे. या छायाचित्रात दिसणारे विवर किंवा विशाल खड्डा सुमारे 1800 मीटर लांबीचा आहे. मंगळाच्या उत्तर गोलार्धात क्रिस प्लॅनिटियामध्ये हे विवर आहे. ते एक ‘इम्पॅक्ट क्रेटर’ म्हणजेच अन्य एखाद्या खगोलाच्या धडकेने बनलेले विवर असल्याचे म्हटले जाते.

‘नासा’ मंगळाची अशीच अन्यही काही अनोखी छायाचित्रे प्रसिद्ध करणार आहे. काही दिवसांपूर्वी मंगळावर धाग्यांसारखी एक वस्तू छायाचित्रातून दिसून आली होती. काही लोकांनी तिला गवत तर काहींनी ‘चाऊमीन’ही म्हटले! मात्र, ‘नासा’ने खुलासा करून सांगितले की, हा धागा लँडिंग करीत असताना वापरलेल्या पॅराशूटचा असू शकतो.

Back to top button