

वॉशिंग्टन : आपली पृथ्वी एका सौरमालिकेचा भाग आहे आणि आपली सौरमालिका 'मिल्की वे' नावाच्या एका आकाशगंगेचा छोटासा भाग आहे. या आकाशगंगेत सूर्यासारखे हजारो तारे व ग्रह आहेत. अशा अनेक आकाशगंगा या ब—ह्मांडात आहेत. आता अशाच दोन अंतराळगंगांची धडक होत असताना दिसून आले आहे. अमेरिकेच्या हवाईमधील मौनाके शिखरावर असलेल्या जेमिनी नॉर्थ टेलिस्कोपने ही धडक टिपली आहे.
या टेलिस्कोपने टिपलेल्या छायाचित्रात दोन आकाशगंगा एकमेकींना चिकटलेल्या दिसून येतात. कोट्यवधी वर्षांनंतर या दोन्ही आकाशगंगा पूर्णपणे एकमेकींमध्ये सामावून जातील. या धडकेमुळे आपल्या 'मिल्की वे' आकाशगंगेच्या भविष्याबाबतही अंदाज लावता येऊ शकतो. धडक होत असलेल्या या आकाशगंगा पृथ्वीपासून 60 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर आहेत. यापैकी एका आकाशगंगेचे नाव 'एनजीसी 4567' आणि दुसरीचे नाव 'एनजीसी 4568' असे आहे. या जोडीला 'बटरफ्लाय गॅलेक्झी' असेही म्हटले जाते.
गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे या दोन्ही आकाशगंगांनी एकमेकींना खेचण्यास सुरुवात केली होती. 50 कोटी वर्षांनंतर या दोन्ही आकाशगंगा एकमेकींमध्ये मिसळून जातील आणि त्यापासून एक नवी अंडाकार आकाशगंगा तयार होईल. सध्या या दोन्ही आकाशगंगा एकमेकींच्या केंद्रापासून 20 हजार प्रकाशवर्ष अंतरावर असून दोन्ही सर्पिलाकार आकाशगंगांचा मूळ आकार जसाच्या तसा आहे.