जगातील सर्वात महागडी कचर्‍याची पिशवी! | पुढारी

जगातील सर्वात महागडी कचर्‍याची पिशवी!

लंडन :  हल्‍ली कोणत्या वस्तूला भाव येईल हे काही सांगता येत नाही. कमोड, चपला यासारख्या वस्तूही जिथे हिरे व सोन्याने मढवून मौल्यवान बनवल्या जात असतील तर बाकीच्या वस्तूंचे काय! आता तर कचरा भरून टाकण्याच्या पिशव्याही महागड्या झाल्या आहेत.

‘बॅलेन्सियागा’ या लक्झरी फॅशन हाऊसने जगातील सर्वात महागडी कचर्‍याची पिशवी लाँच केली आहे. ‘ट्रॅश पाऊच’ नावाच्या या पिशवीच्या फोटोंनी सोशल मीडियात चर्चेला ऊत आला. या एका पिशवीची किंमत 1 लाख 42 हजार रुपयांपेक्षाही अधिक आहे.
बॅलेन्सियागाच्या ‘फॉल-2022’ च्या रेडी-टू-वेअर कलेक्शनमध्ये ही बॅग लाँच करण्यात आली. यामध्ये मॉडेल बॅग हातात घेऊन रॅम्पवर चालत होत्या. 1,790 डॉलर्स म्हणजेच तब्बल 1 लाख 42 हजार रुपयांपेक्षाही अधिक किंमत असलेली ही कचर्‍याची पिशवी पाहून लोक अचंबित झाले.

या पिशव्या निळा, पिवळा, काळा आणि पांढरा अशा चार रंगांमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्या पुढील बाजूला ‘बॅलेन्सियागा’चा लोगो छापलेला आहे. ही पिशवी चामड्यापासून बनवलेली असून तिच्या वरील बाजूस फितीसारखी एक दोरीही आहे. सुमारे दीड लाख रुपयांची पिशवी घेऊन तिच्यामध्ये कचरा भरून टाकणाराही तसाच धनकुबेर असणार यामध्ये नवल नाही. मात्र, हल्‍ली उच्चभ—ू लोकांमध्ये ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून असेही काही प्रकार केले जात असल्याने अशी टूम निघते.

Back to top button