कर्करोगासाठी ‘ही’ दोन कारकेही जबाबदार | पुढारी

कर्करोगासाठी ‘ही’ दोन कारकेही जबाबदार

वॉशिंग्टन : अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या संशोधकांनी कर्करोग होण्यामागील कारणांबाबत एक नवे संशोधन केले आहे. कर्करोगासाठी अनेक गोष्टी जबाबदार ठरत असतात. त्यामध्ये धूम्रपान व वृद्धत्व हे दोन घटक सर्वाधिक जोखमीचे आहेत, असे त्यांना दिसून आले.

या संशोधनाची माहिती कॅन्सर जर्नलमध्ये देण्यात आली आहे. धूम्रपानाशिवाय लठ्ठपणा, कौटुंबिक पार्श्वभूमी हे घटक देखील वैद्यकीय तज्ज्ञांनी कर्करोगाबाबत विचारात घ्यावेत असे संशोधकांनी म्हटले आहे. या संशोधनासाठी कर्करोगाचा कोणताही पूर्वेतिहास नसलेल्या अमेरिकेतील 4,29,991 स्वयंसेवकांची पाहणी करण्यात आली.

रजिस्ट्रेशननंतर पाच वर्षांच्या आत या लोकांपैकी 15,226 लोकांना कर्करोगाचे निदान झाले. महिलांमध्ये बॉडी मास इंडेक्स, टाईप-2 मधुमेह, हिस्टेरेक्टॉमी, कर्करोगाबाबत कौटुंबिक पार्श्वभूमी, उच्च रक्तदाब, ट्यूबल लिगेशन आणि व्यायामाचा अभाव या गोष्टीही कर्करोगाच्या जोखमीशी संबंधित असल्याचे दिसून आले. अमेरिकन कॅन्सर सोसायटीतील लोकसंख्या विज्ञान विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संशोधनाच्या प्रमुख लेखिका डॉ. अल्पा पटेल यांनी याबाबतची माहिती दिली.

त्यांनी सांगितले की कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होण्याचा सर्वाधिक धोका कोणाला आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. या प्रकारचा डाटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही, परंतु भविष्यातील स्क्रीनिंगसाठीच्या पर्यायांची माहिती देण्यासाठी तो निश्चितच आवश्यक आहे. धूम्रपानाचे व्यसन आणि ज्येष्ठत्व किंवा वृद्धत्व या दोन घटकांमुळे कर्करोग होण्याची जोखिम असते, असे दिसून आले आहे.

Back to top button