चक्क हिरव्या बलकाची अंडी! | पुढारी

चक्क हिरव्या बलकाची अंडी!

तिरुवनंतपुरम : केरळच्या मलप्पूरम येथील एका छोट्या पोल्ट्री फार्ममधील सहा कोंबड्या चक्क हिरव्या बलकाची अंडी देऊ लागल्या आणि त्यामुळे मालकासह अन्य लोक चकीत झाले. त्याची काही छायाचित्रेही प्रसिद्ध झालेली आहेत. या कोंबड्या हिरव्या पालेभाज्या, परसातील वनौषधी खात असल्याने त्यांच्या अंड्यामधील बलक हिरवा बनल्याचे मालकाने सांगितले. या कोंबड्यांवर आणि त्यांच्या अंड्यांवर आता संशोधनही झाले आहे.

ओथुकुंगल नावाच्या गावात ए.के. शहाबुद्दीन यांचा हा पोल्ट्री फार्म आहे. त्यांनी सोशल मीडियात या हिरव्या बलकाच्या अंड्यांचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून आपण व आपले कुटुंबीय अशा हिरव्या बलकाची अंडी पाहत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, आता त्यांनी सोशल मीडियाद्वारे या अंड्यांची माहिती इतरांना दिली आहे.

ज्यावेळी या कुटुंबाने पहिल्यांदा हिरव्या बलकाचे अंडे पाहिले त्यावेळी ते खाण्यास योग्य आहे की नाही हे त्यांना कळेना. अन्यही काही कोंबड्यांनी दिलेली अंडी अशीच हिरव्या बलकाची असल्याचे त्यांना आढळून आले. ‘केरला वेटेरीनरी अँड अ‍ॅनिमल सायन्सेस युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी या अंड्यांबाबतचे फोटो व व्हिडीओ पाहिल्यावर त्यांनी पोल्ट्री फार्मला भेट दिली. त्यांनी संशोधनासाठी एक कोंबडी व काही अंडी घेतली.

‘केव्हीएएसयू’च्या पोल्ट्री सायन्स डिपार्टमेंटमधील सहायक प्राध्यापक डॉ. एस. शंकरलिंगम यांनी सांगितले की जनुकीय कारणांमुळे हे घडलेले नाही. या कोंबड्यांना जे खाद्य देण्यात येत होते, त्याचाच हा परिणाम असल्याचे दिसून येते. या कोंबड्यांना विद्यापीठात सामान्य खाद्य देण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी घातलेल्या अंड्यांचा बलक नेहमीप्रमाणेच पिवळा असल्याचे आढळले.

Back to top button