कुत्र्या-मांजरांना ‘कूल’ ठेवणारा पोशाख | पुढारी

कुत्र्या-मांजरांना ‘कूल’ ठेवणारा पोशाख

टोकियो : आजुबाजूच्या वातावरणाशी, हवामानाशी जुळवून घेण्यासाठीची क्षमता नैसर्गिकरीत्याच प्राण्यांना मिळालेली असते. मात्र, तरीही माणसाला आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी वाटते व त्यांना अधिक उकाडा जाणवू नये किंवा थंडी जाणवू नये म्हणून प्रयत्न सुरू होतात. आता अशाच प्रयत्नातून जपानमध्ये कुत्र्या-मांजरांना उकाड्यापासून आराम देणारे खास पोशाख बनवण्यात आले आहेत.

यंदा युरोपियन देशांपासून ते जपानपर्यंत अनेक देशांमध्ये अभूतपूर्व अशी तापमानवाढ पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम माणसाबरोबरच प्राण्यांवरही होत आहे. काही पाळीव प्राणी असह्य उकाड्याने आक्रमक, चिडचिडे झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे अशा उकाड्यापासून प्राण्यांना दिलासा देण्यासाठी टोकियोतील एका कापड उत्पादक कंपनीने अनोखे पाऊल उचलले. कंपनीने पाळीव कुत्र्या-मांजरांसाठी एक असा पोशाख बनवला ज्यामध्ये पंखा आहे. हा पोशाख परिधान केल्यावर पंख्याच्या हवेने प्राण्यांना गारवा मिळतो.

एका अर्थी हा परिधान करता येणारा म्हणजेच ‘वेअरेबल फॅन’ आहे. हा पोशाख बनवत असताना कंपनीने पशू चिकित्सकांचीही मदत घेतलेली आहे जेणेकरून प्राण्यांसाठी हा सुरक्षित व आरामदायक ठरेल. हा पोशाख एका विशिष्ट उपकरणासह बनवलेला आहे. या उपकरणात 80 ग्रॅम वजनाचा पंखा आहे जो बॅटरीवर चालतो. त्यामधील हवा या जाळीदार पोशाखातून बाहेर येते. व प्राण्याच्या शरीराच्या चारही बाजूला फैलावते.

Back to top button