बारा वर्षांच्या मुलाने बनवले तीन अ‍ॅप्स | पुढारी

बारा वर्षांच्या मुलाने बनवले तीन अ‍ॅप्स

चंदीगढ : हरियाणामधील अवघ्या बारा वर्षांच्या मुलाने तीन अ‍ॅप विकसित केले आहेत. आता तो जगातील सर्वात लहान वयाचा अ‍ॅप डेव्हलपर बनला असून याबाबत त्याच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. त्याने यू ट्यूबवरून माहिती घेत हे अ‍ॅप विकसित केले आहेत.

झज्जरच्या नवोदय विद्यालयात आठवीमध्ये शिकत असलेल्या या मुलाचे नाव कार्तिकेय जाखड असे आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याच्या शेतकरी असलेल्या वडिलांनी ऑनलाईन शिक्षणासाठी त्याला दहा हजार रुपयांचा मोबाईल फोन घेऊन दिला होता. याच फोनचा वापर करीत त्याने अ‍ॅप कसे बनवले जातात याचे धडे यू ट्यूबच्या माध्यमातून घेतले. त्याने सांगितले की मोबाईल फोनमध्ये बर्‍याच समस्या होत्या, कारण कोडिंगच्या प्रक्रियेवेळी तो हँग होत असे.

त्यामुळे यू ट्यूबच्याच मदतीने मी फोन ठीक केला आणि आपले शिक्षण पुढे चालू ठेवले. मी तीन अ‍ॅप बनवले, पहिले ल्यूसेंट जीके ऑनलाईन नावाचा सामान्य ज्ञानाशी संबंधित अ‍ॅप होते. दुसरे राम कार्तिक लर्निंग सेंटर हे अ‍ॅप कोडिंग व ग्राफिक डिझायनिंग शिकवणारे होते तर तिसरे अ‍ॅप श्रीराम कार्तिक डिजिटल एज्युकेशन हे होते. आता हे अ‍ॅप 45 हजारांपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी सादर केले आहे. त्याला हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्तीही मिळाली आहे.

Back to top button