‘बर्फाच्या डोंगरा’वरचा चिमुकला निर्जन ‘देश’! | पुढारी

‘बर्फाच्या डोंगरा’वरचा चिमुकला निर्जन ‘देश’!

लंडन : जगभरात अत्यंत छोट्या आकाराचे काही देश आहेत. मात्र, एखाद्या ग्लेशियर किंवा हिमनदीवरील चिमुकल्या देशाबाबत तुम्ही ऐकले आहे का? आठ वर्षांपूर्वी म्हणजेच 5 मार्च 2014 या दिवशी ‘ग्रीनपीस’ने चिलीच्या कायद्यांमधील एका त्रुटीचा लाभ घेत घोषित केले की चिली आणि अर्जेंटिनामधील रिकाम्या जागी असलेल्या 8,800 मैलांच्या ग्लेशियरचा भाग आमचा स्वतंत्र देश आहे. त्याचे नाव ‘ग्लेशियर रिपब्लिक’ असे आहे. हा देश ‘मायक्रो नेशन’ म्हणून ओळखला जातो.

एक वास्तविक राष्ट्र म्हणून काही बाबींची पूर्तता व्हावी लागते जी ग्रीनपीसच्या सौजन्याने ‘ग्लेशियर रिपब्लिक’ला प्रदान करण्यात आली आहे. त्यामध्ये एक ध्वज आणि स्वातंत्र्याच्या घोषणेबरोबर 40 आंतरराष्ट्रीय दुतावासांचाही समावेश आहे. या देशाच्या ध्वजामध्ये तीन शिखरांची काळी रूपरेखा आहे. ध्वजाचा पार्श्वभाग निळ्या रंगाचा आहे. या देशाची राजधानी म्हणजे ग्लेशियरवरील एका अज्ञात ठिकाणी ठोकण्यात आलेला तंबू! ‘ग्रीनपीस’चे कार्यकर्ते ‘ग्लेशियर रिपब्लिक’चा अधिकृत पासपोर्टही जारी करते आणि लवकरच देशाच्या एका फुटबॉल टीमचीही सुरुवात केली जाणार आहे. या देशाची लोकसंख्या ‘1,65,000’ सांगितली जाते.

आता या बर्फाच्या ढिगार्‍यावर इतके लोक कुठून आले व कसे राहतात असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. मात्र, ही केवळ कागदोपत्री लोकसंख्या आहे. इतक्या लोकांच्या ‘पिटिशन सिग्नेचर्स’नाच लोकसंख्या मानले जात आहे. याठिकाणी काही जोडप्यांनी लग्नही केलेले आहे. अर्थात या ग्लेशियरला स्वतंत्र देश म्हणून संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली नाही.

Back to top button