थोडा वेळ चालणेही बदलू शकते जीवन | पुढारी

थोडा वेळ चालणेही बदलू शकते जीवन

लखनौ : सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीचा आपल्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. जेवण झाले की, लागलीच लोक झोपी जातात अथवा दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करतात. अशी बहुतेक लोकांची जीवनशैली बनली आहे. असे जर घडत असेल, तर सावधान व्हा, असा इशाराच तज्ज्ञांनी दिला आहे.

रात्रीच्या सुमारास जेवण करून थेट झोपी गेल्यास ते लठ्ठपणासह अनेक आजारांचे कारण बनू शकते. याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होत असतो. यासाठीच जेवण झाल्यानंतर काही वेळ चालणे अत्यंत उपयोगी ठरते. असे केल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, गॅस्ट्रिक अशा अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते.

यासंदर्भात करण्यात आलेल्या एक नव्या संशोधनातील निष्कर्षांनुसार जेवण केल्यानंतर किमान 15 मिनिटांच्या चालण्याने शरीरातील शुगर लेवल कमी होते. यामुळे टाईप-टू डायबिटिससारखे जटिल आजार रोखण्यास मदत मिळते. अवघ्या दोन मिनिटांचे चालणेही शरीराला अनेक लाभ मिळवून देत असते.

संबंधित बातम्या

‘मेडिसिन जर्नल’मध्ये नुकतेच एक मेटा अ‍ॅनालिसिस प्रसिद्ध झाले आहे. जेवण केल्यानंतर लागलीच बसून राहणे, झोपी जाणे आणि चालल्याने कोणते परिणाम शरीरात होतात, याची चाचपणी करण्यात आली. यामध्ये असे आढळून आले की, जेवणानंतर पाच मिनिटे चालल्यानेही रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळू शकते. यामुळे जेवणानंतर शतपावली करणे, हे आपल्या आरोग्याच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लाभदायी ठरते.

Back to top button