पोटातून काढला स्टीलचा मोठा ग्लास | पुढारी

पोटातून काढला स्टीलचा मोठा ग्लास

लखनौ : काहीवेळा लहान मुले खेळताना किंवा नकळत नाणे, टाचणी, बाटलीचे टोपण अशा लहानसहान वस्तू गिळतात. एक्स-रेमध्ये पोटात या वस्तू नेमक्या कुठे आहेत, ते तपासून डॉक्टर शस्त्रक्रिया करून या वस्तू काढतात; पण एखाद्याच्या पोटात स्टीलचा ग्लास असल्याचे एक्स-रेमध्ये दिसत असेल, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? हे खरे आहे. खुद्द डॉक्टरच हा एक्स-रे बघून चकित झाले. ही घटना उत्तर प्रदेशातील भटौली गावात घडली आहे. समरनाथ या 50 वर्षांच्या व्यक्तीच्या पोटात ग्लास आढळला आणि यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तो काढलाही.

समरनाथच्या पोटात काही दिवस दुखत होते. यावर त्याने किरकोळ औषधोपचार केले; पण त्याचे दुखणे काही कमी झाले नाही. म्हणून तो डॉ. लाल बहादूर सिद्धार्थ यांच्याकडे गेला. डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्स-रे काढला आणि ते चाटच पडले. कारण, त्यांना या एक्स-रेमध्ये समरनाथच्या पोटात चक्क स्टीलचा ग्लास असल्याचे आढळले. डॉक्टरांनी मोठी शस्त्रक्रिया करून समरनाथच्या पोटातून ग्लास काढला.

परंतु, मूळ प्रश्न असा होता की, त्याच्या पोटात हा ग्लास गेलाच कसा? डॉ. लाल बहादूर सिद्धार्थ यांनी समरनाथला याबाबत विचारले असता त्याने जे सांगितले ते पोटात ग्लास असण्यापेक्षा हैराण करणारे आहे. समरनाथला दारूचे व्यसन होते. एक दिवस मित्रांबरोबर दारू पीत असताना त्यांच्यात वाद झाला आणि मित्रांनी नशेत असणार्‍या समरनाथच्या शरीरात हा ग्लास घुसविला. हे कारण न पटणारे असले, तरी त्याच्या पोटात स्टीलचा ग्लास होता आणि डॉक्टरांनी तो काढला, हे मात्र खरे आहे.

Back to top button