श्रीनगर : काश्मीर खोर्याला देशाच्या अन्य भागाशी सुलभतेने जोडणारा एक भव्य पूल चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे. पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही अधिक उंचीचा हा पूल आता उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. हा रेल्वे पूल 40 किलोग्रॅम टीएनटी स्फोटकांचा स्फोट किंवा 8 रिश्टर स्केलची तीव्रता असलेल्या भूकंपाचा धक्काही सहन करू शकतो. विशेष म्हणजे स्फोटानंतरही या पुलावरून ताशी 30 किलोमीटर वेगाने रेल्वे जाऊ शकते.
हा पूल 1,315 किलोमीटर लांबीचा असून तो ताशी 260 किलोमीटर वेगाने वाहणार्या वार्याचा आघात सहन करू शकतो. या पुलावर एक फुटपाथ आणि एक सायकल मार्गही बनवण्यात आला आहे. हा रेल्वे पूल बारामुल्लास उधमपूर-कटरा-काजीगुंडमार्गे जम्मूला जोडणारा आहे. या पुलाची लांबी 1315 मीटर आहे. त्यामध्ये 467 मीटरचा मेन आर्क स्पेस आहे.
हा आतापर्यंत बनवलेल्या कोणत्याही ब्रॉड गेज लाईनवरील सर्वाधिक लांबीचा आर्क स्पॅन आहे. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवर (324 मीटर) पेक्षा 35 मीटर उंच आणि कुतुब मीनारपेक्षा सुमारे पाच पट अधिक उंचीचा आहे. हा चिनाब रेल्वे पूल विकासाच्या बाबतीत एक मैलाचा दगड ठरू शकतो.
दिल्लीतून काश्मीरमध्ये ट्रकमधून सामान येत असते. त्यामध्ये सुमारे 48 तासांपेक्षाही अधिक वेळ जातो. हा पूल सुरू झाल्यावर ट्रेनने मालवाहतूक केली जाऊ शकेल व वेळेत 20 ते 22 तासांची घट होईल. या पुलासाठी आतापर्यंत 30,350 टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. नदीपासून 359 मीटर उंचीवर हा पूल आहे. हा पूल 120 वर्षे टिकून राहील असे त्याचे डिझाईन बनवलेले आहे. भारतीय अभियंत्यांच्या कौशल्याचे हा पूल एक प्रतीक बनून राहिल.