‘स्मार्ट नेकलेस’ तपासणार रक्तातील साखर | पुढारी

‘स्मार्ट नेकलेस’ तपासणार रक्तातील साखर

वॉशिंग्टन : अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक बॅटरी-फ्री बायोकेमिकल सेन्सर विकसित केला आहे. तो माणसाच्या घामाच्या सहाय्यानेच रक्तातील साखरेचा स्तर मोजतो. हा सेन्सर असलेले उपकरण एखाद्या नेकलेससारखे गळ्यात घालायचे असल्याने त्याला ‘स्मार्ट नेकलेस’ असे नाव देण्यात आले आहे. त्याच्या सहाय्याने आता सुईशिवायच रक्तातील साखरेचे प्रमाण मोजता येऊ शकेल.

गळ्यात लटकणार्‍या पॅडलसारखे हे उपकरण आहे. व्यायामादरम्यान हे उपकरण गळ्यात घातले की ते घामाच्या सहाय्याने रक्तातील साखरेचे प्रमाण तपासते. हे स्मार्ट नेकलेस बॅटरीऐवजी रेझोनान्स सर्किट वापरून कार्य करते, जे बाह्य रीडर सिस्टीमद्वारे पाठवलेले रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल प्रतिबिंबित करते. 30 मिनिटे इनडोअर सायकलिंगमध्ये गुंतल्यानंतर पाहणीत सहभागी लोकांनी पंधरा मिनिटांचा ब—ेक घेतला. त्या दरम्यान त्यांनी गोड पेयेही प्यायली. संशोधकांना माहिती होते की साखरयुक्त पेये पिल्यानंतर घामातील ग्लुकोजची पातळी वाढेल.

ओहायोमधील मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंगचे सहलेखक व सहायक प्राध्यापक जिंगुआ ली यांनी सांगितले की हा नवा सेन्सर ते शोधू शकेल का हा प्रश्न होता. मात्र, या सेन्सरने ग्लुकोजच्या पातळीचा यशस्वीपणे मागोवा घेतला.

Back to top button