‘नासा’ने शोधली ‘सुपरअर्थ’! | पुढारी

‘नासा’ने शोधली ‘सुपरअर्थ’!

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या संशोधकांनी एका नव्या ग्रहाचा शोध लावला असून त्याचे वस्तुमान पाहता त्याला ‘सुपरअर्थ’ असे म्हटले जात आहे. हा नवा ग्रह पृथ्वीपासून सुमारे 37 प्रकाशवर्ष अंतरावर असून त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या तुलनेत चौपट आहे. त्याचे त्याच्या तार्‍यापासूनचे अंतर पृथ्वी व सूर्याच्या अंतराच्या 0.05 पट आहे.

या ग्रहाचा शोध नवीन इन्फ्रारेड मॉनिटरिंग तंत्र वापरून लावण्यात आला आहे. ‘नासा’ने त्याची माहिती सोशल मीडियातून दिली आहे. एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असण्यासाठी त्याचे तार्‍यापासूनचे अंतरही योग्य असावे लागते. अशाच ‘हॅबिटेबल झोन’मध्ये हा ग्रह असल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे. या तार्‍याला ‘रॉस 508 बी’ असे नाव देण्यात आले आहे. एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असण्यासाठी त्याचा पृष्ठभाग खडकाळ किंवा कठीण असावा लागतो, त्याच्या तार्‍यापासूनचे अंतर योग्य असावे लागते जेणेकरून त्याच्यावरील तापमानही योग्य असेल व अशा ग्रहावर पाण्याचेही अस्तित्व असावे लागते.

या तीन गोष्टी अनुकूल असल्या तर अशा ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता वाढते. आता या ग्रहावरही जीवसृष्टीची शक्यता आहे का याचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे या ग्रहाला त्याच्या तार्‍याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी केवळ 10.8 दिवस लागतात. याचा अर्थ त्याच्यावरील वर्ष हे केवळ 10.8 दिवसांचे असते.

Back to top button