आकाशगंगेचे गूढ उकलण्यासाठी हर्शेल दुर्बीण झाली सज्ज | पुढारी

आकाशगंगेचे गूढ उकलण्यासाठी हर्शेल दुर्बीण झाली सज्ज

लंडन : जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिणींमध्ये विल्यम हर्शेल टेलिस्कोपचा समावेश होतो. ही दुर्बीण स्पेनच्या ला पाल्मा येथे आहे. आता आपल्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेच्या निर्मितीचे तपशीलासह गूढ उकलण्यासाठी ही दुर्बीण अधिकच सुसज्ज करण्यात आली आहे. त्यासाठी या दुर्बिणीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे ही दुर्बीण आता एका तासाला एक हजार तार्‍यांची पाहणी करू शकेल. तब्बल 50 लाख तार्‍यांची नोंद होईपर्यंत दुर्बिणीचे हे काम सुरू राहील.

या दुर्बिणीला आता सुपरफास्ट मॅपिंग डिव्हाईस जोडण्यात आले आहे. त्याच्या सहाय्याने प्रत्येक तार्‍याच्या जडणघडणीचे विश्लेषण केले जाईल. तसेच प्रत्येक तार्‍याची गतीही मोजली जाईल. अब्जावधी वर्षांपूर्वी ‘मिल्की वे’ ही आकाशगंगा कशी तयार झाली याची माहिती या संशोधनातून मिळू शकेल.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रा. गेव्हीन डेल्टन यांनी ‘वेव्ह’ नावाचे हे उपकरण विकसित करण्यासाठी दशकापेक्षा अधिक वर्षांचा काळ मेहनत घेतली आहे. आता त्याचा प्रत्यक्ष वापर केला जाण्याची वेळ आल्याने ते अत्यानंदित आहेत. स्पेनच्या ला पाल्मा बेटावरील एका डोंगरपठारावर असलेल्या हर्शेल दुर्बिणीला आता या ‘वेव्ह’ची जोड देण्यात आली आहे. आपल्या आकाशगंगेत 400 अब्जांपेक्षाही अधिक तारे आहेत. त्यापैकी 50 लाख तार्‍यांचा वेध या दुर्बिणीने घेतला जाईल.

Back to top button