4500 वर्षांपूर्वीच्या सूर्यमंदिराचा इजिप्तमध्ये शोध | पुढारी

4500 वर्षांपूर्वीच्या सूर्यमंदिराचा इजिप्तमध्ये शोध

कैरो : इजिप्तमध्ये पुरातत्त्व संशोधकांनी 4500 वर्षांपूर्वीच्या एका मंदिराचे अवशेष शोधून काढले आहेत. हे अवशेष सूर्य मंदिराचे असावेत असा अंदाज आहे. इसवी सनापूर्वी 2465 ते इसवी सनापूर्वी 2323 या काळातील पाचव्या साम्राज्याच्या काळात हे सूर्यमंदिर बांधण्यात आले असावे. राजधानी कैरोच्या दक्षिण भागात असलेल्या सध्याच्या अबुसीर परिसरात हे मंदिर उत्खननात आढळले. राजा न्युसेरे याच्या मंदिराखाली हे अवशेष आढळून आले.

इजिप्तच्या पुरावशेष व पर्यटन मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. इटली व पोलंडच्या संशोधकांनी हे अवशेष शोधले. ही टीम राजा न्यूसेरेच्या मंदिराबाबत संशोधन करीत असताना हे प्राचीन सूर्यमंदिराचे अवशेष सापडले. तिथे कच्च्या विटांच्या इमारतीचे अवशेष आढळून आले आहेत. या इमारतीच्या भग्नावशेषांच्या आत काही मातीची भांडी आढळून आली.

मंदिराच्या इमारतीचा काही भाग पाचव्या साम्राज्यातील सहाव्या फेरोने पाडला होता जेणेकरून तिथे तो आपले मंदिर उभे करू शकेल. गेल्यावर्षीही इजिप्तमध्ये सूर्यमंदिराचे अवशेष सापडले होते. पाचव्या साम्राज्यात इजिप्तमध्ये एकूण चार सूर्यमंदिरे होती असे म्हटले जाते. 19 व्या शतकात त्यापैकी पहिल्या सूर्यमंदिराचा शोध घेण्यात आला होता.

Back to top button