तब्बल 87 किलोमीटरमधील भव्य सरोवर | पुढारी

तब्बल 87 किलोमीटरमधील भव्य सरोवर

जयपूर : आशिया खंडात मानवनिर्मित अशी अनेक मोठी सरोवरे आहेत. त्यामध्येच राजस्थानच्या ढेबर सरोवर किंवा जयसमंद (जय समन्द) सरोवराचा समावेश होतो. उदयपूर जिल्ह्यातील हे सरोवर 87 किलोमीटरच्या क्षेत्रात व्यापलेले आहे. हे भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर असल्याचे मानले जाते.

उदयपूरचे राणा जय सिंह यांनी गोमती नदीवर संगमरवराचे धरण बांधले त्यावेळी सतराव्या शतकात या सरोवराची निर्मिती झाली. उदयपूर शहरापासून हे सरोवर 45 किलोमीटर अंतरावर आहे. स्थापनेवेळी हे सरोवर सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर ठरले होते. त्याचे हे इतकेच वैशिष्ट नाही. हे सरोवर व त्याचा परिसर अतिशय सुंदर असल्याने ते पर्यटकांचे एक आवडीचे स्थळ बनलेले आहे.

या सरोवरात 10 ते 40 एकराची तीन बेटं आहेत. नदीवरील संगमरवरी धरणाची लांबी 984.3 फूट आहे. या सरोवराचे आणखी एक आकर्षण म्हणजे तेथील हवामहल पॅलेस. हे सरोवर महाराणा जय सिंह यांनी सन 1685 मध्ये बनवले होते. शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे हा त्यामागील हेतू होता. हे सरोवर 14 किलोमीटर रुंद आणि 102 फूट खोल आहे. तेथील जयसमंद वन्यजीव अभयारण्यही प्रसिद्ध आहे.

Back to top button