66 वर्षांपूर्वी होता अनेक सुविधांचा फ्रीज! | पुढारी

66 वर्षांपूर्वी होता अनेक सुविधांचा फ्रीज!

वॉशिंग्टन : ‘जुनं ते सोनं’ असे आपल्याकडे म्हटले जाते ते काही खोटे नाही. सध्या तब्बल 66 वर्षांपूर्वीची एक फ्रीजची जाहिरात लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या कृष्णधवल जाहिरातीमध्ये दाखवलेल्या फ्रीजमध्ये ज्या सुविधा आहेत त्या पाहून कुणीही चकीत व्हावे. अनेकांनी तर आपण सध्या वापरत असलेल्या फ्रीजमध्येही अशा सुविधा नसल्याचे म्हटले आहे!

हा फ्रीज 1956 मधील आहे. त्या काळात भारतामध्ये फ्रीजचा प्रसार झालेला नसला तरी पाश्‍चात्त्य देशांमध्ये टीव्हीबरोबरच फ्रीजसारखीही अन्य काही उपकरणे घरोघरी येऊ लागली होती. सध्याचे फ्रीज ऊर्जेची अधिक बचत करणारे फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार रेफ्रीजरेटर आहेत. मात्र, 1950 च्या दशकातील फ्रीजची मजबुती व सोयी-सुविधा सध्याच्या फ्रीजने गमावली आहे की काय असे वाटण्यासारखा हा जुना फ्रीज आहे.

या 66 वर्षांपूर्वीच्या फ्रीजच्या जाहिरातीचा व्हिडीओ आता सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक पाश्‍चात्य मॉडेल फ्रीजची खासियत सांगत असताना दिसून येते. एका ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ आला आणि लोक चकीत झाले. 1 मिनिट आणि 17 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये दाखवलेला फ्रीज अनेक गोष्टीत सरस आहे. हा एक सिंगल डोअर फ्रीज आहे; पण आत इतके कप्पे आहेत की कुणीही चकीत व्हावे.

सध्याप्रमाणेच फ्रीजच्या दारामध्ये सामान ठेवण्याची जागा आहे. मात्र, दरवाजावर काही शटरही आहेत ज्यामुळे सामान झाकलेले आहे. खाली असलेला भाजी ठेवण्याचा बॉक्स सध्याप्रमाणे पूर्णपणे बाहेर काढला जाऊ शकतो. मात्र, त्यामध्येही एक वेगळेपण आहे. फ्रीजमधील बर्फ काढण्याचे तंत्रही ‘हट के’ आहे. आइस ट्रे एका खाचेत घालून उलटे केल्यावर आणि बाहेर खेचल्यावर बर्फाचे तुकडे एका डब्यात पडतात.

Back to top button