वाळवंटी भागात आला पूर! | पुढारी

वाळवंटी भागात आला पूर!

दुबई : वाळवंटात हिमवृष्टी किंवा जोरदार पाऊस अशा गोष्टींची आपण कल्पनाही करीत नाही. मात्र, सहारा वाळवंटाच्या एका भागात गेल्या काही वर्षांपासून हिमवृष्टी होत असून वाळूच्या टेकड्यांवर पांढर्‍याशुभ्र बर्फाची चादरही पाहायला मिळते. कतार आणि संयुक्‍त अरब अमिरात (यूएई) या वाळवंटी देशांमध्ये तर आता मुसळधार पाऊस पडला आहे. पावसामुळे यूएईच्या पूर्वेकडील भागात पूरसद‍ृश स्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून अनेक वाहने वाहून गेली आहेत.

हवामानातील या अचानक झालेल्या बदलामुळे हवामान विभागाने रेड अ‍ॅलर्ट जारी केल्याचे खलीज टाईम्सने म्हटले आहे. दिवसभर कोसळलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर वाहने पाण्यात तरंगत असताना दिसून आली. पुरामुळे सुमारे दोन हजार लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले.

देशातील पावसाने गेल्या 27 वर्षांचा विक्रम मोडला असल्याचे यूएईच्या हवामान खात्याने म्हटले आहे. कतारचीही परिस्थिती यूएईप्रमाणेच आहे. राजधानी दोहामधील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दोहामध्ये सुमारे 38 मि.मी. पावसाची नोंद झाली. गुरुवारपासून तिथे पावसाला सुरुवात झाली असून जुलै-ऑगस्टमध्ये तिथे पाऊस पडणे हे असामान्यच आहे.

Back to top button