सहकार्‍याला गिळणार्‍या ‘ब्लॅक विडो’ तार्‍याचा शोध | पुढारी

सहकार्‍याला गिळणार्‍या ‘ब्लॅक विडो’ तार्‍याचा शोध

लंडन : ब्रह्मांडातील सर्व पिंड एकतर तारे असतात अथवा त्यांच्यापासून बनलेले असतात. मात्र, या खगोलीय पिंडांमध्ये आता अनोख्या ‘न्यूट्रॉन’ तार्‍याचा समावेश करावा लागेल. ज्यावेळी तारे आपल्या जीवनाच्या अंतिम टप्यात असतात, त्यावेळी त्याचा कोअर हा भाग त्याच्याच गुरुत्वाकर्षणात समाविष्ट होऊन जातो, तेव्हा न्यूट्रॉन तार्‍याची निर्मिती होते.

खगोलशास्त्रज्ञांनी सर्वाधिक भारमान असलेल्या न्यूट्रॉन तार्‍याचा शोध लावला आहे. या तार्‍याची खास बाब म्हणजे तो इतक्या प्रचंड वेगाने फिरत आहे की, त्यामुळे त्याने आपल्या सहकारी तार्‍याला पूर्णपणे गिळून टाकले आहे. यामुळे तो आतापर्यंतचा सर्वात जास्त भारमान असलेला न्यूट्रॉन तारा बनला आहे. शास्त्रज्ञांनी या तार्‍याला ‘ब्लॅक विडो’ असे नाव दिले आहे.

न्यूट्रॉन तारे हे आपल्या अनोख्या स्वरूपाबाबत ओळखले जातात. त्यांचे भारमान आपल्या सूर्यापेक्षाही 1.3 ते 2.5 पटीने जास्त असते. अशाच प्रकारच्या सर्वाधिक भारमान असलेल्या न्यूट्रॉन तार्‍याला ‘ब्लॅक विडो’ असे नाव देण्यात आले आहे. असे नाव ठेवण्यामागचे कारण जरा वेगळेच आहे आणि ते म्हणजे आपल्याच तार्‍याला गिळंकृत करणे. हीच प्रवृत्ती मादी कोळीत आळून येते. आपल्या सहकार्‍याशी शरीरसंबंध आल्यानंतर मादी कोळी त्यालाच खाऊन टाकते. याच गुण प्रवृत्तीचा हा न्यूट्रॉन तारा असल्याने खगोलशास्त्रज्ञांनी त्याला ‘ब्लॅक विडो’ असे नाव दिले आहे. याच प्रकारची अजब नावे खगोलशास्त्रज्ञांनी आजपर्यंत अनेक खगोलीय पिंडांना दिलेली आहेत.

Back to top button