डायनासोरच्या काळातील माशाचे जीवाश्म | पुढारी

डायनासोरच्या काळातील माशाचे जीवाश्म

लंडन : इंग्लंडमधील एका शेतात अनपेक्षितपणे एक ‘ज्युरासिक जॅकपॉट’ सापडला. तब्बल 18 कोटी 30 लाख वर्षांपूर्वीच्या म्हणजेच डायनासोरच्या काळातील अनेक जीवांचे जीवाश्म याठिकाणी सापडले व त्यामध्ये एका माशाच्या अत्यंत अनोख्या अशा थ्रीडी जीवाश्माचा समावेश आहे. ग्लुसेस्टरशायरजवळ असलेल्या शेतात हे जीवाश्म आढळून आले. माशाच्या जीवाश्माबरोबरच ‘इचथायोसॉर’ नावाचे सागरी सरीसृप, स्क्वीड, कीटक आणि अन्यही काही प्रागैतिहासिक काळातील जीवांचे जीवाश्म तिथे सापडले. हे सर्व जीवाश्म ज्युरासिक काळाच्या प्रारंभाचे म्हणजेच 201.3 दशलक्ष ते 145 दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत.

या शेतात करण्यात आलेल्या उत्खननावेळी 180 पेक्षाही अधिक जीवाश्म आढळून आले. त्यामध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे या माशाचे जीवाश्म. हे जीवाश्म ‘पॅचिकॉर्मस’ नावाच्या लुप्त प्रजातीच्या माशाचे आहे. त्याच्या डोक्याचे हे त्रिमितीय जीवाश्म अत्यंत अनोखे आहे. रे-फिंड माशांची ही नामशेष झालेली प्रजाती आहे. चिखलात ठोस बनलेल्या एका चुनखडीच्या खडकात हे जीवाश्म आहे. ते अपवादात्मकरीत्या सुस्थितीत जतन झालेले असून, त्यामध्ये काही मऊ ऊतीही आहेत.

या माशाचे खवले, उघडलेले तोंड, डोळे यामधून स्पष्ट दिसतात. त्याचे हे ‘थ्रीडी’ स्वरूप पाहता या जीवाश्माची तुलना आतापर्यंतच्या कोणत्याही जीवाश्माशी होऊ शकत नाही. संशोधक नेविली हॉलिंगवर्थ यांनी सांगितले की, हा मासा जणू काही खडक भेदून बाहेर येत असावा, असेच या जीवाश्मामधून दिसते. हा त्या काळातील ‘बिग माऊथ बिली मास’ असावा.

संबंधित बातम्या
Back to top button