कंपनीच्या बॉसने कर्मचार्‍यांना नेले फॉरेन टूरला! | पुढारी

कंपनीच्या बॉसने कर्मचार्‍यांना नेले फॉरेन टूरला!

सिडनी : आपल्याकडे सुरतमधील एका हिरे व्यापार्‍याने कर्मचार्‍यांना बोनस म्हणून फ्लॅट किंवा गाडी दिल्याचे वृत्त अनेकांनी वाचले असेलच. जगभरात अशाच काही कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना काही देत असताना हात आखडता घेत नाहीत. आता ऑस्ट्रेलियातील एका कंपनीच्या बॉसने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना चक्क फॉरेन टूरला नेले. ही टूर थोडीथोडकी नव्हे, तर चौदा दिवसांची होती. या टूरचा सर्व खर्च बॉसने स्वतःच्या पैशातून केला आणि ही वर्किंग टूर असल्याने कर्मचार्‍यांना या चौदा दिवसांचा पगारही मिळाला!

ऑस्ट्रेलियातील सूप एजन्सी नावाच्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका कात्या वकुलेंको यांनी या टूरचे आयोजन केले होते. इंडोनेशियाच्या निसर्गरम्य अशा बाली बेटावर ही टूर गेली होती. ही एक वर्किंग टूर होती, म्हणजेच या चौदा दिवसांमध्ये कर्मचारी एन्जॉयही करीत होते आणि कामही सुरू होते. या टूरमध्ये स्टाफने स्विमिंग, स्नॉर्कलिंग, क्वाड बाईक रायडिंग, योगा अशा बर्‍याच टीम-बाँडिंग अ‍ॅक्टिव्हिटीज केल्या. बालीमधील एका लक्झरी बंगल्यात या कर्मचार्‍यांची राहण्याची सोय करण्यात आली होती.

कात्या यांनी सांगितले, एका ठिकाणी सोबत काम करण्यासाठी कर्मचार्‍यांमध्ये चांगले ‘बाँडिंग’ असणे गरजेचे आहे. केवळ काम करतानाच नव्हे तर काम झाल्यानंतरही कर्मचार्‍यांमध्ये एकीची भावना असावी. त्यासाठी असे उपक्रम उपयोगी ठरतात. ‘कोव्हिड-19’ ने आपल्याला कामाची अशी नवी पद्धत शिकवली आहे; जी जगभर रूळत आहे. कंपनीचे डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह कुमी हो यांनी सांगितले की, हा अगदी रिफ्रेशिंग अनुभव होता, जो आम्ही आयुष्यभर विसरणार नाही! आम्ही भरपूर एन्जॉय केलाच; शिवाय अगदी प्रॉडक्टिव्ह असं कामही केलं.

Back to top button