सर्वात मोठा शार्क खातो शैवाल!
कॅनबेरा : जगातील सर्वात मोठ्या शार्कबाबत एक नवे संशोधन झाले आहे. व्हेल शार्क 18,500 किलो वजनाचे असतात आणि त्यांची लांबी 32 फूट असते. नव्या संशोधनात असे आढळले आहे की हा महाकाय शार्क केवळ मांसाहारीच आहे असे नाही. तो शाकाहारही घेतो. त्यांचा हा शाकाहार म्हणजे पाण्यातील शैवाल. अर्थात हे शैवाल तो प्रत्यक्षपणे घेतो असे नाही. छोटे शिकार गिळत असताना त्याच्या पोटात हे शैवालही जाते व त्यामधून त्याला पौष्टिक घटक मिळतात.
ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ मरीन सायन्सचे फिश बायोलॉजिस्ट डॉ. मार्क मीकन यांनी सांगितले की हे संशोधन व्हेल शार्कच्या आहाराबाबत आपल्याला अधिक विचार करायला लावते. या नव्या संशोधनामुळे व्हेल शार्क हा जगातील सर्वात मोठा सर्वाहारी जीव बनला आहे. 'सर्वाहारी' या शब्दाला इंग्रजीत 'ओम्नीवोर' असे म्हटले जाते. हा शब्द दोन लॅटिन शब्दांपासून बनला आहे. त्यापैकी 'ओमनीस' चा अर्थ 'सर्वकाही' आणि दुसरा शब्द आहे 'वोरारे' त्याचा अर्थ 'आहार' किंवा 'जेवण'. सर्वाहारी जीव मांसाहार आणि शाकाहार असे दोन्ही प्रकारचा आहार घेतात. माणूसही एक सर्वाहारी प्राणी आहे. मांसाहारी लोक हे मांसाहार आणि शाकाहारही घेत असतात. अन्नसाखळीत सर्वाहारी जीव एक महत्त्वाची भूमिका बजावतात.
डॉ. मिकन यांनी सांगितले, जमिनीवरील सर्व मोठे प्राणी शाकाहारी आहेत. मात्र, पाण्यातील मोठे जीव हे मांसाहारीच असल्याचे आतापर्यंत मानले जात होते. आता या नव्या संशोधनानेच असे दाखवून दिले आहे की पाणी व जमिनीवरील सिस्टीममध्ये फारसा फरक नाही. काळाच्या ओघात व्हेल शार्कने शैवालांना पचवण्याची क्षमता मिळवलेली आहे.

