

लंडन : शवपेट्यांचेही अनेक प्रकार पाहायला मिळत असतात. हल्ली हौसेपोटी अनेक श्रीमंत लोक मोटारीच्या, विमानाच्या किंवा अन्य प्रकारच्या शवपेट्या स्वतःसाठी (जिवंतपणीच!) बनवून घेतात. ही हौस आधुनिक श्रीमंत लोकांमध्येच आहे असे नाही, तर मध्ययुगातील श्रीमंतांमध्येही होती. त्या काळात अनेक श्रीमंत लोकांचे मृतदेह 'बेड बरियल'सह दफन केले जात असत. पलंगावर ही व्यक्ती शांतपणे झोपलेली असावी अशा पद्धतीने हे बेड दफन होत. इंग्लंडमध्ये या पद्धतीचा कसा प्रसार झाला हे एक गूढच होते व ते आता संशोधकांनी उलगडले आहे.
नव्या संशोधनानुसार अशा बेड बरियलचा प्रसार इसवी सनाच्या सातव्या शतकात झाला. विशेषतः श्रीमंत महिलांसाठी अशा बेड बरियलचा वापर केला जात असे. युरोपमधील अशा 72 बेड बरियल्सचा यासाठी अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये स्लोव्हाकियापासून ते इंग्लंडपर्यंतच्या अनेक देशांमध्ये सापडलेल्या बेड बरियल्सचा समावेश होता.
संशोधनात आढळले की इंग्लंडमधील बेड बरियल्स हे केवळ महिलांसाठी वापरले जात होते. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'मिडिव्हल आर्कियॉलॉजी' या नियतकालिकात देण्यात आली आहे. संशोधिका एमा ब्राऊनली यांनी सांगितले की त्या काळातील उच्चभ्रू महिलांसाठी अशा शवपेट्या वापरणे हे महत्त्वाचे मानले जाऊ लागले होते. त्याला एक धार्मिक पार्श्वभूमी तसेच स्त्रीवादाचाही कंगोरा होता.