इलेक्ट्रिक वस्तूंची तिसरी पिन वाचवते प्राण | पुढारी

इलेक्ट्रिक वस्तूंची तिसरी पिन वाचवते प्राण

नवी दिल्ली : आपल्या दैनंदिन जीवनातील बर्‍याच गोष्टी आपण पाहत असतो; पण त्यांच्याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. वेगवेगळ्या विद्युत उपकरणांबाबतही असेच घडते. ज्यावेळी आपण अशा उपकरणांचे प्लग त्यांच्या वापरासाठी सॉकेटमध्ये लावतो त्यावेळी आपण पाहतो की हे सहसा तीन पिनचे असतात. बहुतेक इलेक्ट्रिकल प्लगमध्ये तीन पिन असतात. मात्र, काही विद्युत उपकरणांना तीन पिनऐवजी दोनच पिन असतात. या तिसर्‍या पिनचा काय उपयोग आहे हे माहिती आहे का?

एखादा प्लग जर खोलून पाहिला तर लक्षात येईल की त्याच्या तीन पिनमध्ये तीन तारा जोडलेल्या आहेत. या तीन पिनपैकी दोन पिनचा आकार समान असतो, मात्र तिसरी पिन या दोन पिनपेक्षा थोडी जाड असते. ही पिन सहसा हिरव्या वायरला जोडलेली असते. या वायरला ‘अर्थ वायर’ असे म्हणतात. प्लगमधील या तिसर्‍या पिनचे कार्य अनेकांना ठाऊक नसते. सामान्य परिस्थितीत तिसर्‍या पिनमधून आणि हिरव्या वायरमधून कोणताही विद्युतप्रवाह वाहत नाही.

या वायरचे एक टोक तुम्ही वापरत असलेल्या विद्युत उपकरणाला जोडलेले असते. प्रत्येक रंगाच्या वायरसह पिन प्लगद्वारे पॉईंटला जोडलेला असतो. तो त्यास अर्थिंग किंवा पृथ्वीशी, जमिनीशी जोडतो. त्याला इलेक्ट्रिक ग्राऊंडिंग असेही म्हणतात. काहीवेळा विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होतो. त्यानंतर या उपकरणात विद्युत प्रवाह वाहू लागतो. अशा स्थितीत जर कुणी त्या उपकरणाला स्पर्श केला तर त्याला विजेचा धक्का बसतो.

इलेक्ट्रिक शॉकची तीव—ता मानवी शरीरातून किती विद्युत प्रवाह वाहत आहे यावर अवलंबून असते. जर त्याचे हात ओले असतील तर शरीरातून अधिक विद्युत प्रवाह वाहतो. अशा स्थितीत भयंकर शॉक बसतो व मृत्यूही संभवतो. अशा स्थितीतच जीव वाचवण्यासाठी ही तिसरी पिन उपयुक्त ठरते. तिसर्‍या पिनचा वापर किंवा अर्थिंग ही अशी पद्धत आहे जी सदोष उपकरणांमुळे बसणार्‍या विजेच्या धक्क्यांपासून संरक्षण देऊ शकेल. सर्व मेन पॉवरच्या उपकरणांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे की ते पृथ्वीशी योग्यरीतीने जोडलेले आहेत. प्लगची तिसरी पिन हेच काम करते.

Back to top button