न्यूयॉर्क : विमानाच्या पायलटस्ना आकाशात अनेक वेळा काही गूढ गोष्टी दिसत असतात. त्यांचा संबंध बर्याच वेळा एलियन्स म्हणजेच परग्रहवासी व त्यांच्या 'यूफो' (उडत्या तबकड्या) यांच्याशी जोडला जातो. आता एका पायलटने आकाशात ढगांमध्ये गूढ लाल रंगाचे ठिपके पाहिले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियातही शेअर करण्यात आला असून तो चांगलाच व्हायरलही होत आहे.
अटलांटिक महासागरावरून विमान ढगांच्याही वरून जात असताना खाली असलेल्या ढगांच्या चादरीत असा लाल प्रकाश पायलटला दिसला. दिवे पेटवल्यासारखे लालभडक रंगाचे हे हलते ठिपके त्याला दिसून आले. हे दृश्य पाहून पायलटही आश्चर्यचकीत झाला.
त्याचा व्हिडीओ पाहून अर्थातच अनेक यूजर्सनी आपापले डोके लढवून तर्क करण्यास आणि त्याबाबत कमेंट करण्यास सुरुवात केली. हे लाल ठिपके नेमके काय आहेत याचे कुतुहल अनेकांना वाटले. हा एक प्रकारचा अटलांटिक सॉरेल आहे. तो सहसा सेंट लॉरेन्सचे आखात, कॅनडा ते बर्म्युडापर्यंत दिसून येतो. विशेष म्हणजे या ठिकाणी जहाजांच्या परिघाभोवती शेकडो लाल दिवे वापरून मासे पकडले जातात. या व्हिडीओतील 'लाल दिवा' या तर्काशी जोडला जाऊ शकतो.