कसे असेल नव्या पिढीचे इंटरनेट? | पुढारी

कसे असेल नव्या पिढीचे इंटरनेट?

नवी दिल्ली : आता भारतात ‘5-जी’ तंत्रज्ञान येऊ घातलं आहे. ते नेमकं कसे असेल याची उत्सुकता देशातील नागरिकांना आहे. मोबाईल नेटवर्क आणि डाटा स्पीड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता 5-जी नेटवर्कचा लिलाव सुरू झाला आहे. या लिलावात अनेक मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. 5-जी नेटवर्क आल्यानंतर कॉल आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल, इंटरनेट स्पीड चांगलेच वाढेल हे उघडच आहे!

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 26 जुलैला 5-जी नेटवर्कसाठी लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. 5-जी स्पेक्ट्रम लिलावात चार स्थानिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यामध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीतील प्रमुख जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांसह गौतम अदानी यांच्या अदानी डाटा नेटवर्क्सचाही समावेश आहे. टेलिकॉम क्षेत्रात अदानी प्रथमच प्रवेश करीत आहेत.

5-जी मुळे फास्ट इंटरनेट स्पीडसोबतच दर्जेदार कॉल सुविधा आणि कनेक्टिव्हिटी मिळेल. कॉल ड्रॉपची समस्या दूर होईल. 5-जी साठी यूजर्सला किती खर्च करावा लागेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ते नक्कीच स्वस्त नसतील असे तज्ज्ञांचे मत आहे. 4-जी नेटवर्कवर यूजरला 100 एमबीपीएस स्पीड मिळतो, 5-जी नेटवर्कमध्ये 10 जीबीपीएसपर्यंत स्पीड मिळेल. जगातील अनेक देशांमध्ये 5-जी सर्व्हिस सुरू झालेली आहे. आता भारतातही ती लवकरच सुरू होईल.

Back to top button