डोळे निळे होण्याचा विचित्र आजार! | पुढारी

डोळे निळे होण्याचा विचित्र आजार!

जकार्ता : निळेशार डोळे खरे तर अतिशय सुंदर दिसतात. बाहुल्यांनाही निळे डोळे बनवले जात असतात. मात्र, असे निळे डोळेही एखाद्याच्या समस्येचे कारण बनू शकते असे आपल्याला वाटणार नाही. इंडोनेशियाजवळच्या एका बेटावर ही समस्या आढळून येते. तिथे डोळे निळे होण्याचा एक विचित्र आजार आढळतो. या आजाराचे नाव आहे ‘वाडेनबर्ग सिंड्रोम’.

हा एक जनुकीय आजार आहे. विशिष्ट जनुकीय बदलामुळे डोळ्यांचा रंग तर बदलतोच; पण सोबत बहिरेपणाही येतो. तसेच त्वचेचाही रंग बदलतो. काही जणांच्या डोळ्यांना वेगवेगळे रंगही असतात. अशा लोकांमध्ये एक डोळा निळा तर दुसरा काळा किंवा तपकिरी असू शकतो. पेट्रस वाडेनबर्ग नावाच्या नेत्रतज्ज्ञ डॉक्टरने सन 1947 मध्ये या आजाराच्या लक्षणांची आणि कारणांची मिमांसा केली. त्यामुळे या आजाराला त्यांचेच नाव देण्यात आले आहे.

हा आजार अतिशय कमी लोकांना होतो. 40 हजार लोकांमध्ये एकास हा आजार होतो. इंडोनेशियाजवळच्या बुटोन बेटावर आदिवासी जमातीमधील काहींना ही व्याधी जडल्याचे दिसून आले होते. एकाच जमातीत मोठ्या प्रमाणात असा जनुकीय बदल का झाला असेल याचा उलगडा झालेला नाही.

Back to top button