इबोलाच्या कुळातून आला खतरनाक मारबर्ग विषाणू | पुढारी

इबोलाच्या कुळातून आला खतरनाक मारबर्ग विषाणू

लागोस : घाना देशात या महिन्यात घातक मारबर्ग विषाणूच्या सुरुवातीच्या दोन प्रकरणांची पुष्टी झाली आहे. अत्यंत संक्रामक असा हा विषाणू इबोलाच्या कुळातूनच आलेला आहे. हा विषाणू ‘मारबर्ग व्हायरस डिसीज’ (एमव्हीडी) चे कारण बनतो. त्याला आधी ‘मारबर्ग रक्तस्रावी ताप’ म्हणून ओळखले जात होते.

हा विषाणू मानवामध्ये गंभीर रक्तस्रावी तापाचे कारण बनतो. या आजारात सरासरी मृत्यू दर सुमारे 50 टक्के इतका आहे. हा दर विषाणूचे स्वरूप आणि प्रकरणांच्या प्रबंधनाच्या आधारावर विभिन्न प्रकोपांमध्ये 24 टक्के ते 88 टक्क्यांपर्यंत असतो. सन 1967 मध्ये जर्मनीच्या मारबर्ग नावाच्या शहरात तसेच बेलग्रेड, युगोस्लाव्हिया (आता सर्बिया) येथे या विषाणुजन्य आजाराचे प्रकरण सर्वप्रथम समोर आले होते. दोन्ही शहरांमध्ये एकाच वेळी हा रोग फैलावला.

मारबर्गमधील प्रयोगशाळेत संशोधनासाठी युगांडामधून आणलेल्या माकडांमधून या विषाणूचा प्रसार झाला. या माकडांशी संबंधित रक्त, ऊती व पेशींवर काम करणार्‍या प्रयोगशाळेतील कर्मचार्‍यांना विषाणूचे संक्रमण झाले. या आजारांशी संबंधित 31 प्रकरणांमधील सात रुग्णांचा मृत्यू झाला.

Back to top button