अंतराळ स्थानकाच्या पूर्ततेकडे चीनचे आणखी एक पाऊल | पुढारी

अंतराळ स्थानकाच्या पूर्ततेकडे चीनचे आणखी एक पाऊल

बीजिंग : चीनने आपल्या अंतराळ स्थानकाचे पहिले लॅब मॉड्यूल ‘वेंटियन’ला रविवारी लाँच केले. शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘वेंटियन’ हे नवे मॉडेल कोअर मॉड्यूलसाठी बॅकअप व प्रयोगशाळेच्या रूपात काम करणार आहे. वेंटियन याचा अर्थ ‘स्वर्गाचा शोध’ असा होतो. चीनकडून लाँच करण्यात येणार्‍या तीन मॉड्यूलमध्ये पहिले कोअर मॉड्यूल, तियानहे आणि दोन लॅब मॉड्यूल वेंटियन आणि मेंगटियन यांचा समावेश आहे.

तियानहे मॉड्यूल एप्रिल 2021 मध्ये लाँच करण्यात आले होते, तर मेंगटियन मॉड्यूल येत्या ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात येईल. तिन्ही मॉडेलच्या मदतीने चीन अवकाशात ‘तियांगोंग’ अंतराळ स्थानकाची स्थापना करणार आहे. हे काम यावर्षीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. चायना अ‍ॅकॅडमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी व चिनी मानवयुक्त अंतराळ कार्यक्रमाच्या अंतराळ स्थानक प्रणालीचे उपमुख्य डिझाईनर लियु गँग यांच्या माहितीनुसार, वेंटियन मॉड्यूल हे 17.9 मीटर लांब असून, त्याचा व्यास 4.2 मीटर इतका आहे, तर त्याचे 23 टन इतके टेकऑफ द्रव्यमान आहे.

चिनी मानवयुक्त अंतराळ मोहीम संस्थेनुसार, ‘लाँग मार्क-5 बी 3’ नामक वाहक रॉकेट हे वेंटियनला अंतराळात घेऊन जात आहे. ज्याचे लाँचिंग दक्षिण चिनी प्रांत हैनानच्या किनारपट्टीवरील ‘वेनचांग’ या अंतराळ यान लाँच पॅडवरून करण्यात आले. दरम्यान, चिनी तियांगोंग अंतराळ स्थानक हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापेक्षा 20 पटीने मोठे असून, त्याचे द्रव्यमान सुमारे 460 टन आहे.

Back to top button