‘नासा’चे ‘आर्टेमिस-1’ रॉकेट लवकरच होणार लाँच | पुढारी

‘नासा’चे ‘आर्टेमिस-1’ रॉकेट लवकरच होणार लाँच

वॉशिंग्टन : माणसाला पुन्हा एकदा चंद्रावर घेऊन जाण्याची जय्यत तयारी सुरू आहे. ‘नासा’च्या ‘आर्टेमिस-1’ मोहिमेत अंतराळवीरांना चांद्रभूमीवर नेण्यात येईल. या मोहिमेची सुरुवात आता लवकरच होणार आहे. ‘आर्टेमिस-1’ हे मेगा रॉकेट 29 ऑगस्ट, 2 सप्टेंबर किंवा 5 सप्टेंबरला लाँच केले जाईल. हे मानवरहीत रॉकेट चंद्रावर जाईल व तेथून परत येईल.

‘नासा’च्या एक्सप्लोरेशन सिस्टम डेव्हलपमेंट मिशनचे असोसिएट अ‍ॅडमिनिस्ट्रेटर जिम फ्री यांनी सांगितले की ‘आर्टेमिस-1’ मेगा रॉकेट हे या मोहिमेतील पहिले पाऊल असेल. 2025 पर्यंत माणसाला पुन्हा एकदा चांद्रभूमीवर नेण्याचे लक्ष्य यामधून गाठले जाईल. या मोहिमेत एक महिलाही असेल जी चंद्रावर जाणारी पहिली महिला ठरेल. 29 ऑगस्टला अमेरिकन वेळेनुसार सकाळी 8.33 वाजता लाँच विंडो उघडली जाईल जी दोन तासांसाठी खुली राहील.

जर यावेळी रॉकेट लाँच झाले तर ही मोहीम 42 दिवसांसाठी सुरू राहील आणि हे रॉकेट पुन्हा 10 ऑक्टोबरला पृथ्वीवर परत येईल. 2 सप्टेंबरला अमेरिकन वेळेनुसार दुपारी 12.48 वाजता दोन तासांसाठी दुसरे लाँच विंडो खुले होईल. जर यावेळी रॉकेट लाँच झाले तर ते 11 ऑक्टोबरला परत येईल. 5 सप्टेंबरला अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी 5.12 वाजता दीड तासासाठी लाँच विंडो खुली होईल. यावेळी रॉकेट लाँच झाले तर ते 17 ऑक्टोबरला परत येईल. मानवाला सुरक्षितपणे चंद्रावर नेणे व तेथून परत आणणे यासाठीची ही चाचणीच असेल.

Back to top button