मलेरियाविरुद्धची जगातील पहिली लस तयार, पण… | पुढारी

मलेरियाविरुद्धची जगातील पहिली लस तयार, पण...

लंडन : मलेरियाविरुद्धची जगातील पहिली लस तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. तीन आफ्रिकन देशांमध्ये ही पहिली लस देण्याची तयारीही आता करण्यात येत आहे.

‘ग्लॅक्सोस्मिथक्लाईन’ (जीएसके) ने ही ‘मॉस्क्यूरिक्स’ नावाची लस विकसित केली आहे. ती सुमारे 30 टक्के प्रभावी असून त्यासाठी चार डोस घेणे आवश्यक आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने ही लस तयार करण्यासाठी 200 दशलक्ष डॉलर्सचा मोठा निधी दिला होता. जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियाविरुद्धच्या लढ्यात हे ऐतिहासिक यश असल्याचे म्हटले आहे. मात्र, आता या लसीची महागडी किंमत पाहता ती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेतून फाऊंडेशनने माघार घेतली आहे. फाऊंडेशनने या आठवड्यात सांगितले की ते यापुढे लसीसाठी निधी देणार नाहीत.

गेट्स फाऊंडेशनच्या मलेरिया कार्यक्रमांचे संचालक फिलीप वेल्खॉफ यांनी सांगितले की मलेरियाच्या लसीची परिणामकारकता आम्हाला हवी होती त्यापेक्षा खूपच कमी आहे. ही लस अतिशय महागही आहे आणि ती लोकांना पुरवणे हे एक आव्हानात्मक काम आहे. अधिकाधिक जीव वाचवायचे असतील तर लसीची किंमत आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी पाहाव्या लागतील. वेल्खॉफ यांनी म्हटले आहे की गेट्स फाऊंडेशन ‘गवी’ या लस प्रकल्पाला पाठिंबा देत राहील. या प्रकल्पांतर्गत घाना, केनिया आणि मलावी या तीन आफ्रिकन देशांतील लोकांना सुरुवातीला ही लस मिळणार आहे.

लस 30 टक्केच प्रभावी
चार डोस आवश्यक
किंमत महागडी
तीन देशांत होणार उपलब्ध

Back to top button